– संदीप जाधव
तृतीयपंथीय हा समाजातील उपेक्षित घटक. सामाजिक अवहेलना पदरात पडूनही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. या घटकाचा स्वीकार अजूनही समाजमान्य नाही. या तृतीयपंथीयांचे भावविश्व, वेदना, संघर्ष, रूढी उलगडून दाखविणारे आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी त्यांच्यात आवश्यक असणार्या बदलांसाठी येणारे अडथळे याचे चित्रण अधोरेखित करणारी ‘जेंडर अॅन आयडेंटिटी’ ही नाट्यकृती राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी (21 नोव्हेंबर) रंगमंचावर पाहायला मिळाली. तृतीयपंथीयांची होणारी हेळसांड दर्शवितानाच बदलाचा एक आशावादी किरणही नाटकाने ठळकपणे दाखविला.
अहिल्यानगरच्या कल्पद्रूम फाउंडेशनने सादर केलेल्या ‘जेंडर अॅन आयडेंटिटी’ हे नाटकाचे लेखक डॉ. सोमनाथ सोनवलकर आहेत. त्याचे दिग्दर्शन गणेश लिमकर यांनी केले. पात्रांच्या आव्हानात्मक भूमिका असूनही त्यांनी नाटकाला सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. कलाकारांचा खुललेला अभिनय, बारकाव्यांकडे दिलेले लक्ष आणि तांत्रिक बाजूंची सकारात्मकता यामुळे नाटकाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नाटक प्रभावीपणे साद झाले.
एका सामान्य कुटुंबातील सिद्धांत या पात्राभोवती नाटक फिरते. मुलगा असूनही मुलगी असल्याच्या भावना त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याच्या या अवस्थेला लेखक असलेले वडिल अनिरुद्ध समजून घेतात, मात्र आई असलेल रजनीला हे मान्य नसते. त्यातूनच सिद्धांत घर सोडून तृतीयपंथीयांच्या गोटात सामील होतो. नानी माँ या गुरूच्या सान्निध्यात असलेले डॉली, सिमरन हे तृतीयपंथी सिद्धांतला भेटतात. त्यांच्यात सामील झाल्यानंतर त्याची ‘रित’ होऊन ‘खुशी’ हे नवीन नाव त्याला मिळते. दरम्यानच्या त्याचे वडील तृतीयपंथीयांच्या वेशात येऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.
तृतीयपंथांच्या रूढी-परंपरा, व्यवसायाची बाजू खुशी समजावून घेते. मात्र, तृतीयपंथीयांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सन्मान मिळावी यासाठी काम करण्याचा तिचा मनसुबा असतो. खुशीला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी वडील अनिरुद्ध खूप प्रयत्न करतात, पण खुशी आपल्या निर्णयावर ठाम असते. तृतीयपंथीयांचे अर्थकारण हे पूर्णतः इतरांवर अवलंबून असते. विशिष्ट लयीत टाळ्या वाजवून लोकांकडून पैसे मागितले जातात, पण अनैतिक कृत्यांच्या माध्यमातून होत असलेली तृतीयपंथीयांची ‘वरकमाई’ खुशीला अस्वस्थ करते. लाचारीतून व अनैतिक मार्गाने पैसे कमावण्याला ती स्पष्ट विरोध करते. समाजात मान मिळवायचा असेल तर तृतीयपंथीयांमध्ये शिक्षणाची गरज आहे, त्यातूनच त्यांचे स्वावलंबन होईल. मग इतरांप्रमाणे सामाजिक प्रतिष्ठा मिळेल, असे वारंवार ठासून सांगितल्यानंतर प्रथम डॉली व नंतर सिमरन बदल स्वीकारायला तयार होतात. मात्र, एक नराधम आपली शारीरिक भूक भागविण्यासाठी खुशीलाच उचलून नेतो. तृतीयपंथीयांच्या सामाजिक बदलाचा दिसणारा आशेचा किरण जणू नाहिसा होतो. आपण बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी समाजातील वाईट प्रवृत्ती तसे घडू देणार नाही, याची खात्री सिमरन व डॉलीला वाटते.
नंतरच्या प्रसंगात खुशी रेल्वेखाली आत्महत्या करते. मरणानंतरही तिची सामाजिक अवहेलना होते. नागरिक व व्यवस्थेकडून होणारी हेळसांड या प्रसंगात ठळकपणे जाणवते. शवविच्छेदनानंतर मृतदेह आपल्याच ताब्यात मिळावा यासाठी नानीचा पोलिसांशी संघर्ष होतो. तेथे अनिरुद्ध येतो. तेथील संवादात सरकारी व्यवस्थेच्या अनास्थेवर ठेवले जाते. कितीही कायदे बदलले तरी व्यवस्था व समाज तृतीयपंथीयांना ‘हिजडा’ म्हणूनच ओळखणार असे नानीला मनोमन वाटते. आपल्या मुलात असलेले ‘वेगळेपण’ स्वीकारून मृतदेह घ्यायला आलेल्या अनिरुद्धच्या कृतीचे नानी कोतूक करते. प्रत्येक बाप असा असेल तर तृतीयपंथीयांच्या वेगळ्या गोटाची गरजच उरणार नसल्याचे ती सांगते. स्वतः संवेदनशील लेखक असणारा अनिरुद्ध मग या वर्गाबद्दल लिहायला लागतो तेव्हा हे सर्व पात्र त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि नाटकावर पडदा पडतो.
सहजासहजी सकारात्मक विचार न होणार्या तृतीयपंथीयांच्या विषयाला हात घालणार्या या नाटकाने तृतीयपंथीयांचे संघर्षमय जीवन सहजपणे प्रेक्षकांसमोर ठेवलेच, पण या वर्गाला मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी समाज पुढाकार घेईल का, हा गंभीर प्रश्नही उपस्थित केला. दिग्दर्शक गणेश लिमकर यांनी कथेला परफेक्टपणे रंगमंचावर सादर केले. दिग्दर्शन करतानाच त्यांनी नाटकात भूमिकाही साकारली. इतर पात्रांकडेही त्यांनी चांगले लक्ष दिल्याचे जाणवले. गंभीर प्रश्नाची मांडणी करतानाच काही प्रसंगांनी प्रेक्षकांत कमालीची खसखस पिकवली. काही किरकोळ त्रुटी होत्या, पण नाटकाच्या प्रभावी सादरीकरणापुढे त्या जाणवल्या नाहीत. पुराणकाळापासून तृतीयपंथीयांना असलेला सन्मान इंग्रज राजवटीपासून खंडित झाल्याचेही नाटकाने सांगितले.
अनिरुद्ध ही भूमिका दिग्दर्शक गणेश लिमकर यांनी साकारली. एक संवेदनशील पिता व लेखक त्यांनी उभा केला. मुलीच्या चिंता व तृतीयपंथीयांबद्दलची असणारी आपुलकी विविध प्रसंगांत त्यांच्या हावभावांतून दिसली. हतबलता त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवली. रजनी हे पात्र संध्या पावसे यांनी निभावले. त्यांचा अभिनय समाधानकारक होता. त्यांनी हावभावांकडे आणखी लक्ष द्यायला हवे होते. मुलगा हरविल्याची काळजी त्यांना आणखी करूणपणे दाखवता आली असती. मात्र, पतीवर खेकसण्याचा अभिनय यथायोग्य वाटला. सिद्धांत हे पात्र मोहित मेहेर यांनी वठवले. खुशी असे नामकरण झाल्यानंतर धीरगंभीर हावभावांमुळे तृतीयपंथीयांबद्दलची आस्था त्यांनी छानपैकी दाखवली. डॉली हे पात्र विद्या जोशी यांनी बिनधास्तपणे वठवले. तृतीयपंथयींची लकब त्यांना आणखी प्रभावीपणे दाखवता आली असती. मात्र, त्यांची संवादफेक अगदी उत्तम होती. एका प्रसंगांत भाववाविवश अभिनय मनोमन भावला.
नाटकात सर्वांत लक्षवेधी ठरलेले सिमरन हे पात्र कृष्णा वामने यांनी आत्मविश्वासाने उलगडून दाखवले. तृतीयपंथीयांचे विशिष्ट अंगविक्षेप, हावभाव आणि देहबोलीची भक्कम साथ यामुळे सिमरन या पात्राला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच उचलून धरले. गीतावरील नर्तन व विनोदी हावभावांनी पिकविलेला हशा यामुळे प्रसंग प्रभावीपणे झाले. अगदी हुबेहूब तृतीयपंथीय वाटावा असा त्यांचा अभिनय चांगलाच भाव खावून गेला. त्यांच्या या पात्राने नाटकास चारचाँद लावले. उत्तम गायनाची झलकही त्यांच्यात दिसली. नानी हे पात्र अविनाश कराळे यांनी उभे केले. तृतीयपंथीयांची गुरू असलेले पात्र. परखड-खंबीर स्वभाव व शेवटच्या प्रसंगातील हतबलता त्यांनी व्यवस्थित सांभाळली. प्रौढत्वाकडे झुकलेल्या भक्कम शरीरयष्टीच्या नानीची विशिष्ट चालीतील लकब त्यांना अप्रतिम जमली. हावभावांनीही पात्रास चांगला न्याय दिला. मध्यंतर होतानाचा त्यांचा प्रसंग वातावरण निर्मिती करून गेला.
कांबळे हवालदारला सुनील लामदाडे यांनी व कावळे हवालदाराला सागर खिस्ती यांनी रंगमंचावर आणले. तीन-चार प्रसंगांत असलेली छोटी भूमिका त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली. निलेश मेढे यांनी तीन पात्र साकारले. काही प्रसगांनी प्रेक्षकांत चांगलाच हशा पिकविला. दारूच्या नशेतील पात्र त्यांनी खुलवले. याबरोबरच नंदिनी स्वामी, साई चासकर, अनिकेत जोशी व कालिंदी केसकर यांनीही भूमिका साकारत नाटकात सहभाग नोंदविला. साजेसे असे नेपथ्य अंजना मोरे, समीर कुलकर्णी यांचे होते. अनिरुद्धच्या घरातील कपड्यांची मांडणी अगदीच दारात वाटली. रेल्वे स्टेशनचा माहोल समर्पक वाटला. संगीत संयोजन शैलेश देशमुख यांचे होते. प्रसंगांतील भावूकता, गंभीरता योग्य वाटली. अनेक प्रसंगांना सुसंगत संगीताची उत्तम साथ मिळाल्याने नाटक प्रभावी झाले. प्रकाश योजना विनोद गरूड यांची होती. रंगीत लाईट्स व स्पॉट योग्य वाटले, पण स्मोकचा वापर संयमाने करता आला असता. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांची होती. नानी, सिमरन, अनिरुद्ध या पात्रांना त्यांनी उत्तमपणे रंगवले. खुशीची केशभूषा सुसंगत वाटली नाही. वेशभूषा दीपक लोळगे यांची होती. सर्वच तृतीयपंथीयांची वेशभूषा अगदी समर्पक होती. सिमरनचे उंची पेहराव लक्ष वेधणारे होते. नानीलाही त्यांनी उठावदारपणे सादर केले. रंगमंच व्यवस्था आदित्य घोडेस्वार यांनी नेटकेपणाने पाहिली.
आव्हानात्मक भूमिका असलेल्या पात्रांची योग्य निवड, त्यांच्याकडून करून घेतलेला मेहनती सराव, बारकाव्यांकडे दिलेले लक्ष आणि तृतीयपंथीयांबद्दलचे वास्तव यामुळे दिग्दर्शक गणेश लिमकर यांच्या या नाटकाने स्पर्धा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली. स्वतःबरोबरच कलाकारांच्या कसदार अभिनयानेमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव या नाट्याने घेतला. काही कलाकारांनी पहिल्यांदाच साडी घालून अप्रतीम अभिनय केला. प्रभावीपणे सादर झालेल्या या रंगतदार नाटकाने कायदा व व्यवस्थेला काही प्रश्नही विचारले. तृतीयपंथीयांनाही बदल हवा आहे, मात्र त्यास सामाजिक पाठिंब्याची गरज आहे, हे नाटकाने स्पष्टपणे मांडले.




