Saturday, April 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविकासाचा सिन्नर पॅटर्न संघर्षातून शाश्वत समृद्धीकडे…

विकासाचा सिन्नर पॅटर्न संघर्षातून शाश्वत समृद्धीकडे…

नाशिक । शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

- Advertisement -

‘देशदूत’च्या ‘सिन्नर’ विभागीय कार्यालयाचा बाविसावा वर्धापनदिन आज, बुधवारी साजरा होत आहे. यानिमित्ताने प्रकाशित होत असलेल्या विकास विशेषांकाची कल्पना विशद करणारा लेख.

दुष्काळी तालुका ते उद्योगनगरी असा देदीप्यमान प्रवास सिन्नर तालुक्याने पंचाहत्तर वर्षात केला. या प्रवासाचे साक्षीदार असंख्य असले तरी तालुक्यातूनच पुढे आलेले काही उद्योजक आणि विशेष म्हणजे विकासाची आस असलेले काही लोकप्रतिनिधी अशांच्या कर्तृत्वाचा हा प्रवास म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी झालेल्या संघर्षाचा आलेखच जणू. दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेले तालुक्यातील लोक नशीब आजमाविण्यासाठी एकेकाळी मुंबईला जात. त्या काळात लहरी पावसाच्या भरवशावरच लोकांचे जीवनमान अवलंबून असायचे. उद्योगाचा पत्ता नाही. शेती आहे पण पूर्णत: कोरडवाहू. पाऊस आला तरी तो सिन्नरच्या घाटातच आडवा होणार. वर्षानुवर्षे लोकांनी या पर्जन्यराजाला विनवणी करुन पाहिली पण त्याला काही पाझर फुटला नाही. अखेर तालुक्यातीलच काही उद्योजकांनी विडी वळण्याचा धंदा सुरु करुन लोकांना घरबसल्या चार पैसे मिळण्याची सोय करुन दिली. रिकामे हात एवढे होते की, चांडक, सारडा, वाजे, क्षत्रिय, निंबाळकर, ठाकूर, सावदेकर अशा कितीतरी उद्योजकांनी विडी उद्योगात उडी घेऊन हा व्यवसाय भरभराटीला आणला. आजही, मर्यादित का होईना पण हा उद्योग सुरु आहे, यावरुन त्या पिढीच्या उद्योजकांचे द्रष्टेपण लक्षात यावे.

विडी उद्योगावर दोन ते तीन पिढ्या जगल्या. पुढे अनेकांनी शेतीतही भविष्य शोधायला सुरुवात केली. कोरडवाहू असली तरी नाशिक व इगतपुरी तालुक्याला लागून असलेल्या गावांमध्ये सुदैवाने पाण्याची उपलब्धता दिसू लागली आणि मग तेथे भाजीपाल्याच्या शेतीने दिवस पालटायला सुरुवात झाली. हाच भाजीपाला मुंबईत नेऊन त्यावरही अनेकांनी जगण्याचे नवे पर्याय शोधले. प्रतिकूल परिस्थितीत झगडतांना माणसे कणखर बनत जातात. तालुक्याच्या नशीबी दुष्काळ असला तरी त्याच परिस्थितीने तेथील माणसांना संघर्ष शिकविला. मरायचे नाही, जगायचे ही शिकवण तेव्हाचीच.

आजही ही शिकवण सिन्नरवासीय प्राणपणाने जगतोय. गावागावातील माणसे, बाया तेव्हा दिवसरात्र कामे करायची. महिला सक्षमीकरणाचा एक आगळा प्रयोग तेव्हा असा बघायला मिळाला. कदाचित त्यामुळेच असेल पण याच तालुक्याने त्या काळात रुक्मिणीबाई वाजेंना आमदारपदी निवडून देऊन इतिहास घडविला. खरे तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे आपण म्हणतो, त्याचा जिताजागता अनुभव तालुक्याने मात्र वारंवार घेतला. प्रारंभी शंकरराव वाजे, सूर्यभान गडाख, नंतर तुकाराम दिघोळे, पुढे माणिकराव कोकाटे आणि अलिकडे राजाभाऊ वाजे आदींनी आपापल्या कार्यकर्तृत्वाने या प्रयोगशील इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे काम चालूच ठेवले आहे.

हा इतिहास तसा फार खणून काढण्याचीही गरज नाही. परंतु आजच्या पिढीसाठी तो उलगडून सांगण्याचीही आवश्यकता आहे. सिन्नरसारख्या दोन समाजातील अस्मितेसाठी आग्रही असलेल्या तालुक्यात तर समाजमाध्यमांचा धुमाकूळ किती घातक असू शकतो हे सर्वांनीच काही निवडणुकांमध्ये अनुभवलेले आहे. म्हणूनच काही जुने दाखले देणे गरजेचे तर आहेच, शिवाय त्यातून तालुक्याचा प्रगतीचा नकाशाही अधिक स्पष्ट होत जाईल. राजकारणासाठी जात-समाज यांचा वापर हल्ली निषिद्ध मानला जात नसला तरी पूर्वीही जातीपातीचे तिढे असत. पण ते जीवघेणे कधी नव्हते. राजकारण हे निवडणुकीपुरते राही, पुढे सगळेच एकोप्याने काम करीत. अवघी दोन-चार घरे असलेल्या प्रकाशशेठ शहा यांच्यासारख्या उद्योजकाला जिल्हा बँकेसह औद्योगिक वसाहतीतही राजकीय प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते, हा या तालुक्यातील तेव्हाच्या सामाजिक ऐक्याचा मोठाच पुरावा म्हणता येईल.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांनी सुरुवातीच्या काळात निफाडसह सिन्नरचेही विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. पुढे त्यांचे बंधू रामकृष्ण नाईक यांनीही ते मुंबईत वास्तव्य करीत असले तरी आमदारपद सांभाळले. गंमत म्हणजे लोकांनीही तेव्हा ते आपल्या भागातील नाहीत याचा विचार न करता ते उच्च शिक्षित तसेच वसंतराव यांचे बंधू असणे याला महत्त्व दिले. १९७२ च्या सुमारास तालुक्याने कूस बदलली, असे आज मागे वळून पाहतांना जाणवते. त्या वर्षी राज्यात अभूतपूर्व दुष्काळ पडला होता. कायमस्वरुपी दुष्काळ साहणार्‍या तालुक्यात तर परिस्थिती भीषण होती. तेव्हा शंकरशेठ वाजे व सूर्यभान गडाख यांनी तहसील कचेरीवर मोर्चा काढून ‘हाताला काम द्या, खायला अन्न द्या, पिण्यासाठी पाणी द्या आणि जनावरांना चारा द्या’, अशा घोषणा दिल्या.


खेड्यापाड्यातून अक्षरश: हजारो लोक मोर्चासाठी जमले होते. मोर्चा हिंसक झाला. पोलिसांना गोळीबार करावा लागला. काही जणांना प्राण गमवावे लागले. परिस्थिती भयंकर झाली. दुष्काळाचे चटके सारे राज्यच सहन करीत होते, पण सिन्नरच्या प्रकाराने त्याचा वणवा राज्यभर पेटतोय की काय या भीतीपोटी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तसेच केंद्रीयमंत्री यशवंतराव चव्हाण सिन्नरला धावून आले. नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही परिस्थिती पालटायला हवी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी मांडली. पाझर तलावांच्या कामांच्या माध्यमातून चळवळ करणार्‍या सूर्यभान गडाख यांनी तेव्हा ही तलावाची संकल्पना मांडली.

मुंबईत गेल्यावर नाईकांनी वि.स.पागे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही अशा प्रकारे कामे केली तर लोकांच्या हाताला कामही मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकेल, अशी सूचना केली. गडाख नानांनी मांडलेल्या त्या संकल्पनेतूनच पुढे रोजगार हमी योजना अंमलात आली. त्या काळात सिन्नर व भोर या दोनच तालुक्यात प्रायोगिक तत्वावर रोजगार हमीची योजना राबवून कामे केली गेली. अशा तर्‍हेने रोहयोचा जन्मदाता एकापरीने सिन्नर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. शंकरशेठ वाजे, शंकरराव नवले व सूर्यभान गडाख यांनी त्या काळात जनतेचे प्रश्न सतत शासनदरबारी मांडण्यात पुढाकार घेतला. १९६२, ६७ व ७२ अशी सलग पंधरा वर्षे गडाख नाना व अ‍ॅड. सुदाम भागूजी सांगळे पंचायत समितीत पदाधिकारी होते. साहजिकच त्यांचा तालुक्यावर प्रभाव तर होताच पण नानांच्या सार्वजनिक कामांचा तडाखा जबरदस्त होता. याचा लाभ म्हणूनच ७८ साली सिन्नरवासीयांनी नानांना अपक्ष असतांनाही विधानसभेत पाठविले. तत्पूर्वी त्यांनी भोजापूर असो किंवा कडवा या प्रकल्पांसाठीही लढे दिले. पण काही तरी उद्योग आणल्याशिवाय तालुक्याचे ग्रहण सुटणार नाही हे त्यांना उमगले होते. त्यासाठी त्यांनी औद्योगिक वसाहतीची मागणी विधानसभेत लावून धरली. तालुक्याची दुष्काळी स्थिती पाहून अनेकांनी खिल्ली उडविली. परंतु हार न मानता सर्वांच्या नाकावर टिच्चून सहकारी औद्योगिक वसाहत स्थापून करुन नानांनी क्रांतिकारी काम केले. हा इतिहास घडविण्याचाच भाग होता. अर्थात तालुक्याच्या उत्थानासाठी नानांनी केलेल्या या सार्वजनिक कामाचे नंतर तालुक्यानेही पाहिजे तसे मूल्यमापन केले नाही, असे आज म्हणावेसे वाटते.

नानांशी नेतृत्वाचा संघर्ष करण्यास तेव्हा तुकाराम दिघोळेंनी सुरुवात केलेली होतीच. त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित तरुणाला शरद पवारांनी हेरुन पुढे आणले आणि बघता बघता तालुक्याने दुसर्‍यांदा कूस बदलली. दिघोळे गडाख नानांसारखे आक्रमक नव्हते, पण त्यांच्यात चिकाटी जबरदस्त होती. नानांचे कार्य त्यांनी पाहिलेले होते. त्यामुळे त्यांनी हा संघर्ष आणखी पुढे नेत प्रकाशभाऊ वाजेंच्या साथीने सरकारी औद्योगिक वसाहतीचा नारळ फोडला. ‘आंधळा मागतो एक डोळा अन्? देव देतो दोन,’ अशी सिन्नरवासीयांची तेव्हा अवस्था झाली. दिघोळेंच्या प्रयत्नांना यश येऊन एमआयडीसी आली. त्यासाठी त्यांनी वालदेवी नदीचे पाणी थेट जलवाहिनीद्वारे आणण्याचा भगीरथ प्रयत्न केला. अर्थात तत्पूर्वी थेट दारणेतून जलवाहिनी टाकून सिन्नर शहराच्या पाणीप्रश्नाची तड लागली होती. विकास हळूहळू पावले टाकायला लागला होता. दोन औद्योगिक वसाहतींमुळे त्या काळात गडाख नाना व तुकाराम दिघोळे या दोघांच्याही सकारात्मक राजकारणाचे दाखले राज्यभर दिले जाऊ लागले.

नानांनी तर उद्योग यावेत, यासाठी अनेकांचे उंबरठे झिजविले. सिन्नरचे भाग्य असे हळूहळू पण निश्चित वेगाने धावू लागले. नोकर्‍या उपलब्ध झाल्या. चार पैसे अधिकच मिळू लागले. अनेकांनी तेच पैसे शेतीत गुंतवायला सुरुवात केली. याच दरम्यान देवनदीचे पाणी दुष्काळी भागाला देणे, भोजापूर व कडवा योजनांच्या चर्चा होत होत्या. देवनदी ही तालुक्याची तशी जीवनवाहिनी पण तिच्यावर धरण नसल्याने कधीकाळी पूर आला तरी तो वाहून थेट गोदावरीत पाणी जायचे. दिघोळेंनी कडवा प्रकल्पाचा चिवटपणे पाठपुरावा केला. कडवा कालवा नायगाव, जायगाव मार्गे निफाड तालुक्यात व पुन्हा तेथून सिन्नर तालुक्यात आणला गेला. त्याचा फायदा काही गावांना निश्चितच झाला. तरीही तालुक्याचा पूर्व दुष्काळी भाग हा तहानलेलाच होता. माणिकराव कोकाटेंच्या आगमनानंतर तालुक्याने पुन्हा एकदा कूस बदलली. कोकाटे केवळ आक्रमक नव्हते तर मनात योजलेले काम कोणत्याही स्थितीत करवून घेण्याची धमक त्यांच्यात होती. त्यांनी तालुक्याचा आतला आवाज ओळखून पाण्याशिवाय येथील विकासाचे काही खरे नाही हे समजून काम करायला सुरुवात केली.

आमदारकीचा साराच कालावधी त्यांनी त्यासाठी खर्ची घातला. मधली एक टर्म राजाभाऊ वाजे यांना मिळाली. ते नेमस्त. अधिकार्‍यांनाही साहेब म्हणून काम करवून घेणारे. तालुक्याच्या लहानमोठ्या कामांना त्यांनी वेग दिला. तालुक्याची पाण्याची तहान त्यांनीही जवळून पाहिलेली असल्याने त्यांनी गावागावात लघु पाटबंधारे योजनांचा पाठपुरावा केला. कोकाटे पुन्हा आमदार झाल्यानंतर त्यांनी देवनदीला खर्‍याअर्थाने तालुक्याची संजीवनी बनविण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. वर्षानुवर्षे हा विषय त्यांनी ध्यास घेतल्यागत पूर्ण केला. आज देवनदीवर कुंदेवाडी येथे छोटा बंधारा बांधून तेथून सायाळे पर्यंत ३५ किलोमीटरची तर दुसरा बंधारा खोपडी येथे करुन तेथून मीरगावपर्यंत २५ किलोमीटरची जलवाहिनी टाकली. या दोन बंदिस्त कालव्यांमुळे पूर्व भागातील सर्व नद्या-नाले, बंधारे तुडूंब भरण्यास सुरुवात झाली. गेल्या विधानसभेत माणिकरावांच्या विजयात या कामाने समाधानी झालेल्या मतदारांचा फार मोठा वाटा राहिला. केवळ एवढेच नव्हे तर तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी नेल्याने तेथील शेतीचे सिंचन तर झालेच शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला. माणिकरावांच्या या झुंझार कामामुळे त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली. हा आहे माणिकरावांनी घडविलेला ताजा इतिहास.

आता तर माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्री आहेत आणि राजाभाऊ वाजे हे खासदार आहेत. तालुक्याच्या नशीबात असा दुग्धशर्करा योग प्रथमच आला आहे. यापूर्वी तुकाराम दिघोळेंकडे मंत्रिपद होते, पण ते राज्यमंत्रिपद. माणिकराव थेट कॅबिनेट मंत्रिपदी आले. शिवाय इतिहासात प्रथमच राजाभाऊ वाजेंच्या रुपाने तालुक्याला खासदारकी लाभली आहे. राजाभाऊंनी पुणे- नाशिक रेल्वेसाठी चालविलेला लढा सर्वश्रुत आहेच. तालुक्याचे दोन पक्षातील दोन प्रमुख पुढारी सर्वोच्च स्थानावर असल्याने साहजिकच विकासाची अपेक्षा वाढली आहे. सुदैवाने उभयतांमध्ये राजकीय मतभेद असले तरी तालुक्याच्या विकासाच्या मुद्यावर मतैक्य असते. विनाकारण कामांना विरोध करण्याचा खासदार वाजेंचा स्वभाव नाही. माणिकराव देखील बोलतांना स्पष्ट वाटतात, पण प्रगती असेल तेथे त्यांचा रुकार ठरलेला असतो.

शेतकर्‍यांचे प्रश्न कायमस्वरुपी सुटणारे नाहीत. त्यासाठी उत्तम रस्त्यांचे जाळे तयार करणे, वाहतूक सुलभता (कनेक्टिव्हिटी) वाढवणे, शेतीमाल व इतर साहित्य साठवणुकीसाठी आधुनिक गोदामांची साखळी उभारणे त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणे असा आता भविष्याचा अजेंडा असायला हवा. नव्या युगाचे नवे मॉडेल घेऊन आता पुढे जावे लागणार आहे. माणिकरावांकडे कृषिखाते असतांना त्यांनी असंख्य नव्या योजनांना चाल दिली. दुर्दैवाने त्यांच्याकडील ते खाते गेले असले तरी त्यांनीच सुरु केलेल्या अनेक योजनांचा लाभ शेतकर्‍यांना होत राहील यासाठी दक्ष रहावे लागेल. राजाभाऊ वाजे हे विरोधी खासदार असल्याने निधीसह योजनांबाबत मर्यादा आहेत. तरीही त्यांच्यापरीने ते अत्यंत चिकाटीने वेगवेगळ्या केंद्रीय योजना याव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्येही परस्परांना त्रास देण्याची खुमखुमी दिसत नाही.

राजकारण तर जरुर करायचेच पण तालुक्याच्या हिताचा विषय आला की राजकारण गेलं चुलीत हा विचार महत्वाचा असायला हवा. सिन्नर तालुक्याची संघर्षगाथा ही अशी आगळीवेगळी आहे. राजकीय संघर्ष आहे, पण त्यात तालुक्यातील जनतेच्या विकासाचे ध्येय्य अनुस्युत आहे. एकमेकांच्या पायात पाय अडकविण्यापेक्षा परस्परपूरक काम होत राहिले तर विकासाचा एक वेगळा आदर्श उभा राहतो, सिन्नर हे त्याचे आदर्श उदाहरण म्हणता येईल. सूर्यभान गडाख व तुकाराम दिघोळे यांचा तो संघर्ष त्यामुळेच आजही स्मरणात आहे. हाच विधायक संघर्ष माणिकराव कोकाटे व राजाभाऊ वाजे यांच्या कारकिर्दीतून दिसावा आणि सार्‍या राज्याला पुन्हा एकदा कौतुक वाटावे अशी कामगिरी उभयतांकडून घडावी ही अपेक्षा. अशा सकारात्मक लढाया राजकीय क्षेत्रात सर्वदूर होत राहिल्या तर राज्याच्याच विकासाला चार चाँद लागतील.

ताज्या बातम्या

डंपरची

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीनवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८)...