Friday, September 4, 2026
HomeनगरAhilyanagar : विधान परिषदेसाठी आज अर्ज भरण्याची अखेरची मुदत

Ahilyanagar : विधान परिषदेसाठी आज अर्ज भरण्याची अखेरची मुदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवसांत 32 इच्छुकांनी 48 उमेदवारी अर्ज नेले आहेत. यांपैकी आतापर्यंत केवळ दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, आज सोमवार (दि. 1) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप-महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी अंतिम झालेले आहे, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण मैदानात उतरणार, याबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या अहिल्यानगरच्या जागेसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 25 मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. ही मुदत आज 1 जून रोजी संपणार असून, दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल होणार्‍या अर्जांवरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अहिल्यानगरची ही जागा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती आणि दिवंगत आमदार अरुणकाका जगताप येथे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे सुरुवातीला या जागेवर अजित पवार गटाने दावा केला होता. परंतु, जिल्ह्यातील एकूण 461 मतदारांपैकी तब्बल 207 मतदार एकट्या भाजपचे (नगरसेवक) असल्याने ही जागा भाजप-महायुती लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीची राणीताई लंके यांना उमेदवारी
विधान परिषद निवडणुकीसाठी अहिल्यानगर दक्षिणचे खा. नीलेश लंके यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहिर झाली आहे. आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत आज (सोमवारी) त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

भाजपाकडून नगरची उमेदवारी तनपुरेना

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 17 जागांवरून महायुतीत रस्सीखेच झाल्यानंतर रविवारी अखेर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे. तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीत नांदेड आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे ही जागा भाजपाकडेच आली आहे. भाजपा कडून नुकतेच प्रवेश केेलेले राहुरीचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असुन ते आज अर्ज दाखल करणार आहेत.

जगतापांचे बंड आणि ससाणेंच्या अर्जाकडे लक्ष
महायुतीमधील राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचे बंधू आणि दिवंगत आ. अरुणकाका जगताप यांचे चिरंजीव सचिन जगताप हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांच्या समर्थकांकडून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. तर महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसकडून माजी आ. जयंतराव ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आला असून, ससाणे यांचा एक अपक्ष अर्ज यापूर्वीच दाखल झाला आहे. त्यामुळे ससाणे आज काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

चव्हाण, ससाणे आज अर्ज दाखल करणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे काँग्रेसचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार थोरात यांची अहिल्यानगर जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष किरण पाटील, तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून दीप चव्हाण आणि करण ससाणे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी ही जनतेच्या विश्वासाची पावती असून, अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी ससाणे व चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, आता काँग्रेसचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...