Monday, June 1, 2026
HomeनगरKarjat : अहिल्यादेवींच्या नावाने शेतकर्‍यांना कर्जमाफी

Karjat : अहिल्यादेवींच्या नावाने शेतकर्‍यांना कर्जमाफी

चौंडी येथे 301 वी जयंती उत्साहात साजरी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. हे सरकार जे बोलते ते करून दाखवते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असणार्‍या चौंडी येथे केले. आचारसंहिता असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती त्यांचे जन्मस्थळ असणार्‍या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे रविवारी (दि.31) साजरी करण्यात आली.

यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वागताध्यक्ष राम शिंदे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. रामराव वडकुते, अण्णासाहेब डांगे, आ. गोपीचंद पडळकर, आ. मोनिका राजळे, आ. सुनील कर्जतकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन सभेला न थांबता त्यांनी सकाळी येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळी असणार्‍या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला. त्यानंतर त्यांना तात्काळ नवी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर आयोजित अभिवादन सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर न्याय व स्त्री शक्तीच्या प्रतीक होत्या, त्यांचे चरित्र प्रत्येकाला स्फूर्ती देणारे आहे. त्या युग प्रवर्तक होत्या. त्यांचा राज्यकारभार आदर्श होता. समाज घडविण्याचे काम त्यांनी केले.

चौंडी येथे महायुती सरकारने विकासाचा महायज्ञ जाहीर केला आहे. बाराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आचारसंहिता असल्यामुळे त्यावर जास्त भाष्य करता येणार नाही, परंतु या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा शब्द मी दिला आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत पाळणार. मी भाग्यवान आहे; मी मुख्यमंत्री असताना अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले व उस्मानाबादचे धाराशिव झाले. यावर्षी पाऊस कमी आहे असे म्हणत आहेत, मात्र मी प्रार्थना करतो की चांगला पाऊस पडावा, शेतकर्‍यांना पीक चांगले यावे, शेतकरी समाधानी व आनंदी असावा. मात्र कोणतेही संकट आले तरीदेखील शेतकर्‍यांच्या पाठीशी महायुतीचे सरकार खंबीरपणे उभे राहील. आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, असेही शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, मी भाग्यवान आहे, राज्यातील पहिली उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावी चौंडी येथे येऊन नतमस्तक होता आले आणि तो मान मला मिळाला. चौंडीसाठी अजितदादांनी अर्थमंत्री असताना मोठे योगदान दिल्याची आठवण दिली. तसेच बारामती येथे शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय यांना अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अजितदादांच्या पुढाकारातून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चौंडी येथे होत असलेल्या विकासकामाबद्दल त्यांनी माहिती सरकार संपूर्णपणे मदत करेल असे जाहीर करतानाच होणारी कामी मात्र दर्जेदार व्हावी या ठिकाणी होणारे विकास कामामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वागताध्यक्ष शिंदे म्हणाले, राज्य सरकारने या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे आराखड्याला मान्यता मिळाली असून निविदा प्रसिद्ध झाली आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आचारसंहिता संपताच पहिले भूमिपूजन चौंडी येथे करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
सत्तेवर कोणीही आले तरी देखील मी जाहीर करतो की राज्यातील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तीन दिवस कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस कार्यक्रम झाले. यामध्ये प्रसिद्ध कवींचे संमेलन कुमार विश्वास यांच्या उपस्थितीमध्ये झाले. दुसर्‍या दिवशी ड्रोन शो व फटाक्यांची आतषबाजी कार्यक्रम झाला. रविवारी अभिवादन सभा व महाअभिषेक असे कार्यक्रम झाले.

येत्या 10 दिवसांत कर्जमाफी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत (किंवा 10 दिवसांच्या आत) ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे रविवारी (31 मे) झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात केलेले जलसंधारणाचे काम आणि त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. एका इंग्रज लेखकाचा संदर्भ देत भरणे म्हणाले, जेव्हा जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अहिल्यादेवींचे नाव प्रथम स्थानी असेल. तर चौंडी गावाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी साधारण 1200 ते 1300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील 2-3 वर्षांत या भागाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असे त्यांनी सांगितले.

हा आराखडा तयार करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राम शिंदे आणि अजित पवार यांनी मोठे सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला. धनगर समाजातील तरुण आणि मेंढपाळांसाठी कृषी विभागाच्या वतीने एक नवीन विशेष योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या योजनेवर काम सुरू असून, याचा फायदा समाजातील युवकांना होईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, सुनील कर्जतकर, रामराव वडकुते, उत्तमराव जानकर आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विधान परिषदेसाठी आज अर्ज भरण्याची अखेरची मुदत

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवसांत 32 इच्छुकांनी 48 उमेदवारी अर्ज नेले आहेत. यांपैकी आतापर्यंत केवळ दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले...