
नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
ज्या शिक्षकांनी बनावट शालार्थ आयडी मिळविण्यासाठी लक्षावधी रुपयांची बिदागी मोजली अशांनी तरी आता नाही जनाची तर मनाची बाळगून पुढे येऊन सत्य कथन करायला हवे. जे झाले ते वाईटच, पण कधी कधी वाईटातूनही चांगले होते म्हणतात, त्यानुसार अशांनी जर या घोटाळ्यातील त्यांच्या संदर्भातील आपबिती कथन करायला सुरुवात केली तर शिक्षण क्षेत्रात त्सुनामी येऊन त्यात अनेक मातब्बर धुळीस मिळतील.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटचा पेपर फुटल्याप्रकरणी संपूर्ण देशभर विद्यार्थी व युवा वर्गाने केलेल्या अभूतपूर्व आंदोलनाची धार समेवर असतानाच महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील एका अशाच मासलेवाईक घोटाळ्याच्या पुढच्या कड्या नव्याने उलगडल्या असून आता खर्या अर्थाने त्यातील राजकीय सूत्रधार ऐरणीवर येऊ लागले आहेत. शालार्थ आयडी घोटाळा हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चारित्र्याचे धिंडवडे काढणारा ठरत असून आतापावेतो विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई असा सारा भौगोलिक आसमंत त्याने व्यापलेला दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील व्यापम तर प. बंगालमधील शैक्षणिक घोटाळ्यालाही लाजवेल अशी या शालार्थ आयडी घोटाळ्याची आयडियाची कल्पना आहे.
नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातून बोगस मान्यता देऊन लाखो रुपयांच्या बदल्यात बनावट ‘शालार्थ आयडी’ देण्याचे रॅकेट वर्षानुवर्षे चालवले गेले. संस्थाचालक किंवा मुख्याध्यापकांचे अधिकृत प्रस्ताव नसतानाही दलाल, काही संस्थाचालक व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी त्यासाठी संगनमत केले. संघटित गुन्हेगारीचा हा मासलेवाईक नमुना म्हणता येईल. ‘बॅक डेटेड’ (मागील तारखांचे) बनावट मान्यता आदेश तयार केले गेले. शिक्षणाधिकार्यांनी मध्यस्थांमार्फत प्रतिशिक्षक वा कर्मचार्याकडून मान्यतेसाठी २० ते २५ लाख रुपये उकळले, असे सांगितले जाते. तपासात राज्यातील विविध शाळांमधील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे आयडी बनावट असल्याचे उघड झाले.
एकट्या जळगाव जिल्ह्यात ६३८ (७५ टक्के) बोगस आयडी तयार केले गेले, ज्यातील ११६ कर्मचार्यांचे मूळ दस्तऐवज शालार्थ प्रणालीवर अपलोडच नव्हते. बनावट आदेशांद्वारे शासनाच्या तिजोरीतून पगार व थकबाकीपोटी सुमारे १६० कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आणि या गैरमार्गातून संशयितांनी कोट्यवधींची बेकायदेशीर संपत्ती लाचेपोटी मिळवली, असा संशय आहे. गेल्या वर्षभरात या गुन्ह्याची व्याप्ती वाढता वाढता वाढे अशी लांबत चालली आहे. ज्यांनी फिर्यादी दिल्या असे लोकही नंतर आरोपी होऊन कारागृहाची हवा खात असल्याने हे प्रकरण किती गुंतागुंतीचे आणि गंभीर आहे याची खात्री पटावी. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि नेहमीचेच दलाल अशी ही संघटित गुन्हेगारीची साखळी होती.
अर्थात त्यातील वरच्या कड्या अजूनही तशा अंधारातच आहेत, त्यादेखील लवकर जुळून याव्यात, अशी प्रार्थना करूया. याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड यांना अटक झाल्यानंतर खर्या अर्थाने राजकीय संशयित ऐरणीवर यायला सुरुवात झाली आहे असे म्हणता येते. संजय गरूड हे मूळचे काँग्रेसचे. नंतरच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व त्यातही शरद पवारांच्या पक्षात होते. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना त्यांच्या साम्राज्यात एक-दोनदा नव्हे तर तब्बल तीनवेळा आव्हान देणारे गरूड अखेर झुकले आणि भाजपची म्हणजेच गिरीश महाजनांची दीक्षा घेते झाले. सध्या ते भाजपचे पदाधिकारी तर आहेतच, शिवाय भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्यामुळे मिळणार्या स्वच्छतेच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांना थेट कारागृहात जावे लागल्याने ही उलटी गंगा कशी वाहिली याचीच आता चर्चा होत आहे. शेंदुर्णीचे गरूड घराणे हे अत्यंत प्रतिष्ठित व मानमरातब असलेले.
राज्याच्या राजकारणात माजी आमदार आचार्य गजाननराव रघुनाथराव गरूड (बापूसाहेब गरूड) यांचे नाव एकेकाळी अत्यंत आदराने घेतले जायचे. ज्या जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गिरीश महाजन गेल्या सात टर्मपासून करीत आहेत, त्याच जामनेरचे बापूसाहेब गरूड आमदार होते. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतिपददेखील भूषवले होते. ज्या संस्थेच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरूड यांना अटक झाली ती संस्था आचार्य गजाननराव यांनीच स्थापन करून वाढविली. संजय हे त्यांचे पुतणे. ज्यांना आचार्य म्हणून लोक आदराने गौरवायचे त्यांच्याच वारसदाराने केलेल्या कारनाम्यांमुळे व त्यांना अटक झाल्याने गरूड घराण्याची प्रतिष्ठा, मानमरातब धुळीला मिळाली आहे. संकटमोचक महाजन यांची संगत त्यांना संकटापासून वाचवू शकली नाही, हे महत्त्वाचे.
मार्च २०२५ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात या संबंधातील पहिला गुन्हा दाखल झाला. तेव्हा फिर्यादी असलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हेच नंतर मुख्य संशयित म्हणून तुरुंगात गेले. या प्रकरणाची चौकशी करणारे तत्कालीन पोलीस अधिकारी अशोक गिरी यांनीदेखील वाहत्या गंगेत हात धुतल्याचा प्रकार नंतर उघडकीस आला आणि आता तेदेखील या गुन्ह्यात सहसंशयित आहेत. पुढे अधिक तपासानंतर यावर्षी पुन्हा नव्याने गुन्हे दाखल होत गेले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात आल्यानंतर दीडशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल होताना मोक्का कायद्यान्वये कलमे लावली गेली. तत्कालीन उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, नितीन उपासनी व नितीन बच्छाव हे या प्रकरणाचे मास्टरमाईंड ठरले. विशेष तपास पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपविल्यानंतर त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा भाग म्हणून आतापावेतो ११९९ संशयित आढळले असून १२०० शिक्षक व कर्मचारी रडारवर आहेत.
तपासाधिकारी एसीपी संदीप मिटके यांच्या पथकाने खणून काढलेल्या या गुन्ह्यामुळे सरकारही हादरले. नाशिकचे शिक्षणमंत्री असताना हा सारा तमाशा चालू होता. सुदैवाने किमान आतापावेतो तरी सर्व संबंधित संशयितांना जेरबंद करण्यात यंत्रणेला यश आले आहे. तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र तपास पथकाने न्यायालयात सादर केले असून खटल्याची सुनावणी सुरू असतानाच नवनवे मोहरे हाती लागत असल्याने मारुतीच्या शेपटासारखी या प्रकरणाची लांबी वाढतच चालली आहे. ही गुन्हेगारीची व्याप्ती पाहता, आज आपल्या शिक्षण व्यवस्थेचा मूळ उद्देशच हरवला आहे की काय, अशी शंका येते. शाळा म्हणजे ज्ञानाची मंदिरे आहेत, तिथं पैशाचा बाजार मांडू नका, असे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांनी जीव तोडून सांगितले होते. एवढेच नव्हे तर आपल्या ग्रामगीतेतून राष्ट्रसंत म्हणून गौरविले गेलेले तुकडोजी महाराज यांनीही
शिकोनिया पदव्या घेतल्या भारी|
परी अंतरीची सुधरेना वृत्याचारी|
असे सांगत शिक्षणाचा बाजार मांडणार्यांच्या वृत्तीवर प्रहार केले होते. हे तर काहीच नाही, चारशे वर्षांपूर्वीही संत तुकारामांनी
चित्त शुद्ध नाही ज्याचे |
तेथे बोध काय करील त्याचे |
असा अभंग रचून जर हेतू आणि चित्त शुद्ध नसेल, तर त्यांच्या ज्ञानाचा समाजाला काहीही फायदा होत नाही, असे सांगितले होते. आज या सर्व समाजसुधारकांची तीव्रतेने आठवण यासाठी होते की त्या काळात त्यांनी अशा प्रवृत्तींविरोधात आवाज उठविण्याचे केवळ धाडस केले नाही तर समाजाला त्यापासून सावध करण्याचे महान कार्य केले.
आज यापैकी फार काही होत नाही. शालार्थ आयडी घोटाळ्यात कोण सहभागी आहेत तर शिक्षण क्षेत्रातील सगळ्या टप्प्यावरील मंडळी. प्रत्येकाने भ्रष्टाचाराच्या या गटारगंगेत आपले हात धुवून घेतले आहेत. ज्ञानदानासारख्या पवित्र कार्यात ही अशी सगळीच बदमाशगिरी चालली आहे. आज जात्यात गेले त्यांच्याविषयी संताप व्यक्त होत असला तरी अजूनही कित्येक जण सुपात आहेत. हळूहळू जसजसा तपास पुढे सरकत जाईल तसतशी बदमाशांची ही यादीही वाढत जाईल, असे आतातरी दिसते आहे. संजय गरूड यांच्या रूपाने पहिलाच संस्थाचालक पोलिसांच्या गळाला लागला असला तरी असे कितीतरी संस्थाचालक अजूनही कक्षेबाहेर आहेत. सत्तारुढ पक्षाचाच मोठा मासा गळाला लागल्याने आता उरलेल्यांना हात लावायला यंत्रणांना कदाचित फारसे कष्ट पडणार नाहीत.
मध्यंतरी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या काही अंतर्गत मतभेदांमुळे झालेल्या संघर्षात शिक्षण खात्याला चंचूप्रवेश मिळाला. संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक मंडळ लादले गेले. गंमत म्हणजे ज्यांनी या संस्थेच्या कारभाराचे सुसूत्रीकरण करायचे त्यांनाच शालार्थ आयडी प्रकरणात आत जावे लागले. आता बोला. ज्याच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या त्यानेच हात साफ केल्यासारखेच हे. आता ही संस्था पालकांविना चालू आहे. शिक्षण खात्यालाही काही घेणेदेणे नाही. शिक्षणमंत्री दादा भुसे नाशिकचेच असले तरी त्यांच्याही कानावर ही बाब आलेली दिसत नाही. आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातेय, अशी ही अवस्था. पेपर फुटीप्रकरणी कठोरातील कठोर कायदा नुकताच संमत झाला. पण शिक्षण क्षेत्रातील ही भ्रष्टाचाराची, दलालांची कीड मुळापासून नष्ट करण्याची कोणतीच योजना सरकारकडे नाही. शिक्षण व्यवस्था सुधारणे ही तर त्यानंतरची खूप पुढची पायरी. शिक्षण खात्यातील व त्याच्याशी संबंधित संस्थांमधील एकापाठोपाठ एक असे शेकडो लोक कारागृहात चालले असतानाही आमचे शिक्षण खाते जागचे हललेले नाही. सगळे काही सुखेनैव चालू असल्याचे दिसते.
रस्त्यावरही नोकरीच्या ऑर्डर्स देणारे एक अधिकारी असंख्य आरोपांचे वार झेलूनही आता निवृत्तीपश्चात पुन्हा तेच उद्योग चक्क नाशिकमध्येच करीत असल्याचीही माहिती आहे. खात्यातील आपल्या अनुभवाच्या जोरावर संबंधितांना आमिषे दाखवून ही बदमाशी चालू असल्याचे कळते. मध्यंतरी माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या संस्थेवरही वेगळ्या प्रकरणी कारवाई झाली. मोठी संस्था लवकर ऐरणीवर आली असली तरी त्यामागे राजकीय कारणे अधिक कारगर ठरलेली दिसतात. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आता अशा सर्वच प्रकरणांमध्ये लक्ष घालून किमान शालेय शिक्षणातील घाण बाजूला करून साफसफाई मोहीम सुरू करायला हवी. ज्या शिक्षकांनी बनावट शालार्थ आयडी मिळविण्यासाठी लक्षावधी रुपयांची बिदागी मोजली, अशांनी तरी आता नाही जनाची तर मनाची तरी बाळगून पुढे येऊन सत्य कथन करायला हवे.
जे झाले ते वाईटच, पण कधी कधी वाईटातूनही चांगले होते म्हणतात, त्यानुसार अशांनी जर या घोटाळ्यातील त्यांच्या संदर्भातील आपबिती कथन करायला सुरुवात केली तर शिक्षण क्षेत्रात त्सुनामी येऊन त्यात अनेक मातब्बर धुळीस मिळतील. अर्थात, हा फार मोठा आशावाद झाला. अशा कामांसाठी मनाचा हिय्या करून धाडसाने पुढे येणारी पिढी आता इतिहासजमा झाली आहे. त्यामुळेच पदरी पडले पवित्र झाले, या अल्पसंतुष्टीलाच सलाम करून जमेल तितका चांगला विचार करून पुढे जावे लागणार आहे. शालार्थ आयडीप्रकरणी शेकडोंना अटक झालेली असली, त्याविषयी प्रचंड चर्चा चालू असल्यातरी प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीनंतर कोणा-कोणाला शिक्षा होणार याला खरे महत्त्व आहे. उद्या ही सगळीच मंडळी पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सुटली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण या घोटाळ्याच्या शालार्थ या शीर्षकातच अर्थ दडला आहे.
मो. ९३२५३८३०९२




