
नाशिक | Nashik
येथील गोल्फ क्लब मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १७ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) सुरू आहे. या आंदोलनातील एका उपोषणकर्त्याची तब्येत १२ दिवसांच्या उपोषणामुळे अचानक खालावली आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. काल (बुधवारी) या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक दौऱ्यावर आलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पाठीशी असल्याची ग्वाही दिली. आज (गुरुवारी) शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्त्र सोडले.
यावेळी ते म्हणाले की, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या (Tribal Student) आश्रमशाळा आणि इतर समस्यांबाबतच्या मागण्या अत्यंत रास्त व सोप्या आहेत. पुण्यात जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा सरकारने खोटे आश्वासन देऊन उपोषण सोडवायला लावले आणि विद्यार्थ्यांची फसवणूक (Fraud) केली. आता नाशिकमध्ये (Nashik) १२ दिवस झाले विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, तरीही सरकारचा एकही प्रतिनिधी इथे आलेला नाही. उपोषणकर्त्याचा जीव गेला तरी या सरकारला काहीही देणेघेणे नाही,” असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “राज्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील (Rural Area) रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, राज्यात नक्की सरकार कोण चालवत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे देश हलणार नाही, मग सरकार उत्तर का देत नाही?” असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता मोठे राजकीय बळ मिळाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर तीव्र टीका
दरम्यान पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित (Santosh Pandit) यांना झालेल्या अटकेबाबत आणि विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करत सडकून टीका केली. ते म्हणाले की, “पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना त्यांच्या घरातून रात्री १ वाजता अटक करण्यात आली हे निषेधार्थ आहे. जे सामाजिक काम राजकीय पक्षांनी किंवा समाजाने करायला हवे, ते हे कार्यकर्ते करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटक करणे कोणत्या कायद्यात बसते? असा सवाल त्यांनी केला. तसेच विद्यानंद बापट (Vidyananda Bapat) हे कुठल्याही धर्माच्या किंवा सणाच्या विरोधात बोलत नव्हते. गणेशोत्सवात डीजे असावा की नाही यावर ते बोलत होते. मात्र, त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणे म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह आहेत, असे त्यांनी म्हटले.
उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
गेल्या १२ दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे एका उपोषणकर्त्याची रक्तातील साखरेची पातळी (शुगर लेव्हल) ६० पर्यंत खाली घसरली आहे. डॉक्टरांच्या मते ही पातळी अत्यंत धोकादायक आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संबंधित आंदोलकाला तात्काळ आंदोलनस्थळीच रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावून उपचार सुरू करण्यात आले आहेत. या तीव्र परिस्थितीनंतर आंदोलकांनी आता सर्वपक्षीय पाठिंब्याची मागणी करत आपला लढा राजभवनावर नेण्याचा इशारा दिला आहे.




