
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) रोज नवे खुलासे समोर येत आहेत. धुळे जिल्ह्यातील (Dhule District) साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलचा लॅब असिस्टंट तुषारकुमार उखाजीराव साळुंके याने स्वतः संगणकीय ज्ञानाचा गैरवापर करत तत्कालिन शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षकांशी आर्थिक व्यवहार आणि तडजाेड करुन बनावट शालार्थ आयडींचे जाळे विणल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या पदावर तो कार्यरत होता, ते लॅब असिस्टंटचे पदही त्याने बनावट पद्धतीनेच मिळवल्याचा संशय बळावला आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. साळुंके याला नाशिक जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजेच सात सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या एसआयटीकडून त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा (प्रॉपर्टी) कसून शोध घेतला जात आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, तुषार साळुंके याला संगणकाचे ज्ञान असल्याने त्याने या घोटाळ्यात मुख्य तांत्रिक सूत्रधाराची भूमिका बजावली. त्याने शिक्षण संस्था चालक व संशयित मध्यस्थ प्रशांत वाडीले याच्याशी संगनमत करून तब्बल पाच ते सहा शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर शालार्थ आयडी तयार केले. या बनावट वैयक्तिक मान्यता आणि आदेश मिळवण्यासाठी साळुंकेने तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित प्रविण अहिरे आणि वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांच्याशी आर्थिक व्यवहार केले. धुळे जिल्हा परिषदेच्या जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड करून बनावट (Fake) आदेश घुसवण्यात आले आणि शिक्षण विभागाची दिशाभूल करून शासनाचा करोडो रुपयांचा निधी लाटण्यात आला. साळुंके आणि त्याच्या साथीदारांनी धुळे व शिरपूर येथे विविध शाळांमध्ये बेकायदेशीर मान्यता मिळवून दिल्याचे समाेर आले आहे.
चार महिन्यांपासून गुंगारा
या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे आणि मीनाक्षी गिरी हे दोघेही गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार आहेत. एसआयटीचे पथक या दोघांच्या मागावर असून, साळुंकेच्या अटकेनंतर आता या पसार अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साळुंकेच्या चौकशीतून या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणारे महत्त्वाचे दुवे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
घोटाळ्यात आठवी अटक
नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात नाशिक विभागातील एकूण ८४१ कर्मचाऱ्यांचे आयडी बनावट आढळले असून, त्यापैकी ६३८ कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, संस्थाचालक प्रशांत वाडीले, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, भाजप पदाधिकारी संजय गरूड व दीपक गरूड यांना अटक झाली आहे. साळुंके हा या गुन्ह्यातील आठवा संशयित आहे.
असे विणले संस्थांमध्ये जाळे
- ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, दोंडाईचा (जि. धुळे): वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय (तावखेडा) व इंदिरा गांधी हायस्कूल (कर्ले/कलवा) – २ शिक्षकेतर कर्मचारी व १ शिक्षक. (तत्कालीन वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी यांच्या माध्यमातून मान्यता)
- जय योगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, देवपूर (धुळे): न्यू इंग्लिश स्कूल, शिरडाणे – ३ शिक्षक. (तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला देऊन)
- जनता विकास मंडळ, बुरझाड (जि. धुळे): कै. भाऊसाहेब पी. आर. पाटील शाळा – २ शिक्षकेतर कर्मचारी. (तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांच्याकडून मान्यता)
- पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी: कै. अ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर – ७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. (प्रविण अहिरे यांच्या माध्यमातून)
- विधायक समिती, पिंपळनेर: कै. एन. एस. पी. पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर – ९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. (प्रविण अहिरे यांना लाच देऊन आदेश प्राप्त)




