नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लोककलावंत हे लोकपरंपरेचे जिवंत विद्यापीठ असून, त्यांच्याकडे असलेले ज्ञान व अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लोककलेचे अभ्यासक, संशोधक व लेखक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स अँड फॅशन डिझाईन, पंचवटी, नाशिक तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लुप्त होणार्या महाराष्ट्रातील लोककला’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप उत्साहात झाला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिर सांस्कृतिक विभागाच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखा अध्यक्ष रवींद्र कदम, अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखेचे कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते.
यावेळी ढगे यांनी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. प्रा. प्रवीण जाधव यांनी महाराष्ट्र राज्यगीत सादर केले, तर प्रा. योगेश चिकटगावकर यांनी पारंपरिक गण सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.सूत्रसंचालन प्रा. सोनाली मरसाळे यांनी केले.कार्यशाळेतील सहभागी कलाकारांचा सत्कार प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष चौरसिया यांनी विशेष सहकार्य केले.
विविध कलांचे सादरीकरण
कार्यशाळेत महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांपैकी पिंगळा, वासुदेव, भारुड, पोवाडा, तमाशा, जागरण, पोतराज, बतावणी, दशावतार आणि लोकगीत आदी कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. प्रा. योगेश चिकटगावकर, प्रा. प्रवीण जाधव, विकास कोकाटे आणि अशोक सोनवणे यांनी विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण केले. त्यांना श्रीकृष्ण शिरसाठ, अर्जुन पवार (संबळ), आदेश चव्हाण (हार्मोनियम), विराज लोंढे, समाधान मुर्तडक, कमलेश रोडगे (तुणतुणे), सागर पळसकर (दिमडी), सुमनबाई चव्हाण-नांदगावकर (मुरळी) आणि प्रताप जाधव यांनी दोन दिवस प्रभावी साथ दिली.




