Saturday, September 26, 2026
Homeनगरजीवन अनुभवांची वाट दाखवणारी पुस्तके

जीवन अनुभवांची वाट दाखवणारी पुस्तके

संगमनेर | Sangamner

पाठ्यपुस्तकांच्या आशयाच्या पलिकडे पाठ्यपुस्तकात सूचवलेले उपक्रम व कृतीशील स्वाध्यायांचा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो.त्यामुळे शिक्षण आनंनदायी होण्यास मदत होणार आहे. केवळ धडे, कविता, प्रकरणांखालील प्रश्न-उत्तरांचा विचार करून फार तर विद्यार्थी गुण मिळवू शकतील, मात्र त्या पलिकडे शिक्षणातून समग्र व्यक्तिमत्त्वाचा विकास अपेक्षित केलेला आहे, त्यासाठी कृतीशीलतेचा स्वाध्याय देण्यात आला आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या साधन, तंत्रनिहाय स्वाध्याय सूचवले आहेत. पाठ्यपुस्तकांवर सातत्याने घेतले जाणारे आक्षेप जरी खरे मानले, तरी चौकटीबाहेर जाऊन शिक्षणाची पाऊलवाट या पुस्तकांनी दर्शित केल्या आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या मदतीने आपल्याला शिक्षणाची व्यापक वाट चालणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी पाठ्यपुस्तकांचा समग्र आणि सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तके समजून घेणे घडले की, आपल्याला अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापनाच्या पारंपरिक चौकटी मोडणे सहज शक्य होणार आहे.

- Advertisement -

बालभारतीने तिसरीचे मराठी प्रथम भाषेचे पाठ्यपुस्तक समजून घेतले, तर त्याच्या मुखपृष्ठावर वारली चित्र आहे. चौथीच्या भाषा विषयाच्या पुस्तकावर विविध वाद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतर विषयांच्या मुखपृष्ठावर अनुषंगिक व संदर्भानेयुक्त मुखपृष्ठांचा समावेश करण्यात आलेला आहे. अत्यंत आकर्षक आणि विद्यार्थ्यांना खिळून ठेवतील अशीच ती मुखपृष्ठ आहेत. मुलांना त्यांच्या भावविश्वातील पुस्तक हाती पडताच पाठ्यपुस्तक आनंद देणारे ठरणारे आहे. प्रश्नांची विविधता देखील दखलपात्र आहे. पाठ्यपुस्तके प्रत्यक्षात चांगली विकसित झाली तरी प्रत्यक्ष वर्ग प्रक्रियेत कशी उपयोगात आणली जातात हेच अधिक महत्वाचे ठरणार आहे. शेवटी पुस्तकांचा परिणाम हा प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन करताना किती विविधतेने ती प्रक्रिया केली जाते यावर पाठ्यपुस्तकाचे यश अवलंबून असते. त्यासाठी किती विविध स्वरूपाचे अध्ययन अनुभव दिले जातात हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे नव्या धोरणाचे अपेक्षित यश केवळ पाठ्यपुस्तक बदलून साध्य होणार नाही, तर त्या पलिकडे असलेली अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन यावरच बरेच काही अवलंबून असणार आहे. ही पुस्तके अभ्यासक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यास निश्चित हातभार लावतील.

पाठ्यपुस्तकात तुमच्या परिसरातील कोणत्याही एका दुकानाला शिक्षक/पालक यांच्या समवेत भेट द्या, दुकानादाराशी चर्चा करून त्यांच्या व्यवसायाविषयी माहिती मिळवा. अशाप्रकारची क्षेत्रभेट सूचवली आहे. या क्षेत्रभेटीत विद्यार्थी परिसरात असलेल्या विविध व्यवसायांना भेटी देऊ शकतात. वर्गात असलेल्या पंचवीस तीस विद्यार्थ्यांनी भेटी देताना विविध व्यावसायिक निवडले. त्या भेटीनंतर वर्गात एकत्रित चर्चा घडवून आणली तर एकाचवेळी वर्गात एकापेक्षा जास्त व्यावसायाची माहिती मिळेल. त्यातून मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल. त्याचबरोबर संवादासाठी लागणारे संवाद कौशल्य, धाडस, प्रश्न विचारण्याचे कौशल्य, प्रश्न विचारण्यासाठी लागणारी भाषिक रचनेचे आकलन होईल. मुलांच्या मनात जिज्ञासा निर्माण होण्याबरोबर ती शमवण्यासाठीचा मार्ग या क्षेत्रभेटीतून साध्य होईल. त्याचबरोबर विविध व्यवसायाविषयीची उत्सुकता उंचावल्याने त्यातूनही विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी गेल्यास प्रश्न विचारून माहिती घेऊ शकेल.

यासारख्या क्षेत्रभेटीतून विद्यार्थी अधिक चौकस होण्यास मदत होईल. विद्यार्थी चौकस झाल्यास ज्ञानाचा प्रवास अधिक सुलभ होईल. शिकण्याची प्रक्रिया आणि निष्पत्ती अशा एकमेकात गुंतलेल्या असतात. असे घडल्यास चौकटी बाहेरील शिक्षणाची वाट अधिक विस्तारात जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक पाठातून, कवितेतून तुम्ही काय शिकलात? असा प्रश्न विचारून मुलांना आपण अधिक विचार प्रक्रियेच्या दिशेने घेऊन जाण्याची वाट निर्माण करत आहोत. केवळ लेखकाला, कवीला काय वाटते या बरोबर मुलांना काय वाटते हा विचार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुलांना पाठातील आशयाला जोडून स्वतःचे जीवन अनुभवता येणार आहे. असे घडल्याने शिक्षण आणि जीवन यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल. हाताची घडी तोंडावर बोट म्हणजे शाळा असे अनेकदा म्हटले जाते. मात्र त्या पंरपरेला फाटा देत पुस्तकात ‘चर्चा करूया’ अशा शीर्षकाखाली स्वाध्याय देण्यात आले आहेत. हे स्वाध्याय मुलांच्या मनातील दडलेल्या भावभावनांचे प्रतिबिंब असणार आहे.

अभिव्यक्त होण्याच्या दृष्टीने या स्वाध्यायाचा अधिक लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी चर्चा करण्याची पाऊलवाटेचा प्रवास करतील किमान आपले म्हणणे अधिक ठामपणे मांडू शकतील हे खरेच, पण त्याचवेळी इतरांचे म्हणणे देखील ऐकण्याची क्षमता निर्माण होईल. आपल्यापेक्षा इतरांचे म्हणणे वेगळे असू शकते, ते स्वीकारायला हवे हा विचार संस्कारही अधिक महत्त्वाचा ठरतो. शेवटी देशातील संसदीय लोकशाहीसाठी लागणारी बीजे हे शिक्षणातून पुढे जात असतात. बी मातीमध्ये असते तेव्हा ‘बी’ला काय वाटत असेल? असा प्रश्न विचारला आहे. मुळात या स्वरूपाचे प्रश्न सर्वच इयत्तांमध्ये विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न विचार करण्यास प्रेरित करणारे, कल्पना, तर्क करता येणे, अंदाज घेता येणे यांसारख्या प्रश्नांच्या माध्यमातून सृजनशक्तिच्या विकासाची पाऊलवाटच निर्माण होणार आहेत. तार्किक क्षमता विकसित होईल, न जाणो या कल्पनेला शक्ती देणार्‍या प्रश्नांमुळे आपल्याला अधिकाधिक चांगले कवी, लेखक, नाटककार, वैज्ञानिक मिळतील.

आम्हांला हे समजले, विचार करा व सांगा, चर्चा करूया, लिहिते होऊया, वाचते होऊया, खेळूया शब्दांशी, जाणून घेऊया, कृतीतून शिकूया, आपण समजून घेऊ, चला वाचूया अशा विविध शीर्षकाखाली विचारलेले प्रश्न मुलांच्या मस्तकावर भार न वाटता शिकण्यास आनंद देणारी ठरणार आहेत. त्यामुळे शिकणे आनंददायी होईल असा विश्वास वाटतो. गरज आहे या स्वाध्यायांची वर्गात अंमलबजावणी करण्याची आणि नव्या वाटांचा प्रवास घडवण्याची. शेवटी पाठ्यपुस्तकं म्हणजे केवळ शब्द-चित्रांची जत्रा नाही, तर त्या शब्द पसार्‍यातून मुलांची मने घडत असतात, या मनातून जबाबदार नागरिकाची निर्मिती घडणार असते. त्यातून नवा समाज, नवे राष्ट्र उभे राहत असते. म्हणून सध्या तरी पाठ्यपुस्तकांकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. (क्रमशः)

ताज्या बातम्या