मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व फुटीनंतर दोन्ही तट एकत्र येण्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सुनेत्रा पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, विलीनीकरणाच्या सर्व अफवांना आणि चर्चांना आताच ‘फुलस्टॉप’ दिला पाहिजे,” असा रोखठोक इशारा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी दिला आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी “कुणाला यायचे असेल तर आमच्या पक्षात यावे, आम्ही कुठेही जाणार नाही” असे विधान केल्यानंतर अनिल पाटील यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता काही नेत्यांकडून वर्तवली जात होती. पक्षातील अंतर्गत मतभेदांवर आणि नरहरी झिरवळ यांच्यासारख्या नेत्यांच्या ‘युती’च्या इच्छेवर भाष्य करताना राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, मंत्री अनिल पाटील यांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी काय विधान केले, यापेक्षा महत्त्वाचा विषय हा आहे की, विलीनीकरणाची चर्चा ही कुठल्याही स्तरावर झालेली मी तरी ऐकलेली नाही. शरद पवार हे दुसऱ्या पक्षाचे आणि देशाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी ‘आमच्या पक्षात या’ असे विधान केले असेल, तर ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात. मात्र, आमच्या पक्षाचे काम स्वतंत्रपणे आणि पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे.”
तसेच शरद पवार गट एनडीएमध्ये (NDA) सामील होणार का, या चर्चेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “एनडीएच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांची काय चर्चा झाली, याचे उत्तर केवळ शरद पवारच देऊ शकतात. आमच्यासोबत किंवा आमच्यासमोर एनडीएमध्ये जाण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही.” दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या सर्व शक्यता फेटाळत अनिल पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आता आपापल्या स्वतंत्र वाटेनेच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




