Wednesday, October 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

पुणे(प्रतिनिधी)
-पुणे पोलीस दलातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश भाऊसाहेबपाटील (वय ५५) यांनी औंध येथील आपल्या राहत्या घरात शासकीय पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. घरातील सोफ्यावर बसून त्यांनी हे टोकाचेपाऊल उचलले असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पुणे पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

नीलेश पाटील हे पुणे पोलीस दलात भरती झाले होते आणि पुढे पदोन्नतीने (श्रेणी) पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाले होते. ते औंध परिसरातील नागरस रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये कुटुंबासह राहत होते; यापूर्वी ते खडक पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. बुधवारी (७ ऑक्टोबर) उच्च न्यायालयातील कामाच्या निमित्ताने ते मुंबईला जाणार होते, परंतु ते मुंबईला गेले नाहीत. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते औंध येथील राहत्या घरी सोफ्यावर बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा घरातच उपस्थित होता.

घरातील सोफ्यावर बसलेल्या पाटील यांनी अचानक स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा मोठा आवाज ऐकताच त्यांचा मुलगा तात्काळ खोलीबाहेर आला असता, पाटील हे सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. घटनेनंतर त्यांना लागलीच उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी घोषित केले. पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

या आत्महत्येच्या कारणाबाबत अधिक माहिती देताना चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांना गेल्या काही काळापासून आरोग्यविषयक गंभीर समस्या होत्या. या आजारपणामुळे गणेशोत्सवापूर्वी ते सुमारे एक ते दोन महिने सुट्टीवर गेले होते. त्यानंतर गणेशोत्सवातील पोलीस बंदोबस्ताच्या कर्तव्यासाठी ते पुन्हा सेवेत रूजू झाले होते. मात्र, सततच्या आरोग्यविषयक समस्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून ते तीव्र नैराश्यात होते. या आत्महत्येचे निश्चित आणि मूळ कारण अद्याप अस्पष्ट असून, चतु:शृंगी पोलीस ठाण्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या