अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँक ही शेतकर्यांची बँक आहे. त्यामुळे या बँकेने साखर कारखानदारांना कोट्यवधी रूपयांचे कर्ज देण्यापेक्षा शेतकर्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी बँकेने प्राधान्याने धोरण आखावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांचा रविवारी (दि. 22) आ. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येथील सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, सीताराम काकडे, संदीप वर्पे, किसन लोटके आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, आज सत्तेसाठी सहकार क्षेत्राची बोली लावली जात आहे. सहकाराच्या माध्यमातून नवीन नेतृत्व उभे राहू नये, यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही खा. लंके यांनी विरोधकांच्या तंबूत प्रवेश करून त्यांची मते फोडली आणि गनिमी काव्याने विजय मिळविला. त्यांचा हा विजय केवळ एका संचालकपदापुरता मर्यादित नसून आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची मोठी संधी लंके यांना मिळाली आहे. बँकेचा कारभार शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा होण्यासाठी त्यांनी संचालक म्हणून प्रभावी भूमिका बजावावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकर्यांचे प्रत्यक्ष नुकसान प्रचंड असताना सरकारकडून केवळ पाच हजार रूपयांची मदत दिली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. शेतीच्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. अशा अपुर्या आर्थिक मदतीमुळे शेतकर्यांवरील संकट अधिक गंभीर होत असून नैराश्यातून शेतकरी आत्महत्यांसारख्या घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने केवळ घोषणांवर न थांबता नुकसानग्रस्त शेतकर्यांना पुरेशी आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी खा. भगरे, माजी खा. लोखंडे आणि गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले.




