नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
अखेर ढगफुटीची अफवाच निघाली आणि सगळ्या नाशिककरांनी अगदी पोलिस, प्रशासन, महापालिका. आपत्कालीन यंत्रणा अशा सर्वांनीच नि:श्वास सोडला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नाशिकचे अघोषित पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच आदल्या दिवशी नाशिक परिसरात तीनशे मिलिमीटर पावसासह ढगफुटीची शक्यता बोलून दाखविल्याने शब्दश: हाहाकार उडाला. साक्षात देवाभाऊंनी जाहीर केलेले असल्याने नसत्या शंका का घ्या असा विचार करून प्रशासनाने लागलीच शाळांना सुट्टी जाहीर केली. विद्यापीठांनी नियोजित परीक्षा रद्द केल्या. सरकारी आस्थापनांनी आपापले आपत्कालीन विभाग सतर्क केले.
महापालिका प्रतिबंधात्मक उपायांसाठी सज्ज झाली. महापौर, उपमहापौर, आयुक्त अशा सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेऊन सावध रहा, काळजी घ्या, आम्ही आहोतच वगैरे आवाहने जनतेला केली. लोकप्रतिनिधींनीही रील्सद्वारा लोकांना सतर्क केले. दिवसभर आधीच पावसाची भुरभूर त्यात या ढगफुटीच्या शक्यतेच्या भीतीने नाशिककर पाऱ गारठून गेले. अनेकांनी तर दुसर्या दिवशीच्या सगळ्या कामांना रजा देऊन टाकली. अनेक डॉक्टरांनी आपल्या शस्रक्रिया एकतर रद्द केल्या किंवा पुढे ढकलल्या. क्लिनिकवाल्यांनी अपॉइंटमेंट रद्द केल्या. एवढेच कशाला, दुसर्या दिवशी सकाळी चहाच्या टपर्या, नाश्त्याचे पॉइंट्स यांनीही सुटी एन्जॉय केली. रात्रभर पावसाची रिपरीप सुरूच होती. काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मुसळधार वर्षाव चालू असल्याने ढगफुटीच्या भीतीत भर पडतच गेली. सकाळी मात्र चक्क पावसाने अधूनमधून विश्रांती घ्यायला सुरुवात केली
. मधूनच सूर्यानेही दर्शन दिल्याने लोक भीतीच्या धक्क्यातून बाहेर यायला लागले. साधारण दुपारी, आता काही ही ढगफुटी येत नाही, याचा अंदाज यायला लागला आणि मग रील्सवाल्यांची धूम सुरू झाली. सोशल मीडियाला तर असे विषय म्हणजे जणू पर्वणीच. झाले, पर्जन्यराजाच्या ढगफुटीने नाशिकला कात्रजचा घाट दाखविला असला तरी या सोशल मीडियावरील रील्सची मात्र नंतर ढगफुटी झाली. तोपर्यंत प्रशासनानेही ‘ते’ ढग, सुरत व अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेकडे वळले, आता नाशिकला काही धोका नाही वगैरे दिलाशाचे मेसेज पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी, आपल्यावरील संकट टळल्याचे व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. पाठोपाठ, विरोधकांनी हे कसे फेक नॅरेटिव्ह होते, मुंबइ-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकवर कोसळलेली दरड व त्यामुळे ही दोन्ही महानगरे कशी संपर्कहीन झाली हे सांगत, जनतेचे त्यावरील लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी ही ढगफुटीची आवई उठविण्यात आल्याचा आरोप करायला सुरुवात केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर, अयोध्येतील चोरीप्रकरणी काँग्रेसच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये यासाठीच हे ढगफुटीचे कारस्थान केल्याचाही आरोप केला. सोशल मीडियावर महाशक्ती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना नंतर चांगलाच रंगला. त्याचाही एवढा वर्षाव झाला की, लोकांना नंतर या सार्या करमणुकीचेही कदाचित अजीर्ण झाले असेल. राज्याच्या प्रमुखाने अशारितीने आदल्या दिवशीच एखाद्या परिसरात ढगफुटी होणार किंवा प्रचंड पाऊस पडणार असे सांगण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळेही लोक गांगरून गेले, अशीही टीका आता होत आहे. तीनशे मिलिमीटर तर सोडाच पण साधा शंभर मिलिमीटर पाऊसही न पडल्याने आतापर्यंत हवामान खात्याच्या अंदाजावर लोकांचा विश्वास नसायचा, यापुढे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर तो राहणार नाही, अशीही कुजबुज मोहीम सुरू केली गेली. मुख्यमंत्र्यांनीच घोषित केलेले असल्याने महापालिकेची यंत्रणा एवढी सजग, तत्पर व सतर्क झाली की त्याचेही अनेकांना कौतुक वाटले.
गेले पंधरा दिवस नाशिककर रस्त्यांची कामे व त्यात पावसाने केलेली दैना सहन करीत असताना, याच पालिकेच्या यंत्रणेला रहदारीच्या मार्गावरील चार खड्डे बुजवून वाहनधारकांचा त्रास थोडा कमी करावा, असे कधीही वाटले नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी केवळ अंदाज व्यक्त केला तर यंत्रणा एवढी कार्यक्षम झाली. ही कार्यक्षमता अशीच कायम रहावी, अशी अपेक्षा आता लोक व्यक्त करीत आहेत. अर्थात, यातील चेष्टेचा वा करमणुकीचा भाग वजा केला तर प्रथमच शासन, प्रशासनाने एखाद्या आपत्तीविषयी एवढी दक्षता घेत तयारी केली हे मात्र मान्य करावे लागेल. समजा, खरोखरच ढगफुटी झाली असती आणि त्यामुळे जनता संकटात सापडली असती तर.. हा विचारदेखील करवत नाही.
आज, संभाव्य संकट आले नाही म्हणून ठीक, पण ते आले असते आणि प्रशासनाची तयारी नसती तर झालेली हानी ही अधिक काळजीची व दु:खद ठरू शकली असती. त्याचमुळे ढगफुटी झाली नसली तरी संभाव्य संकटासाठी करावयाच्या तयारीची ही रंगीत तालीम मात्र उत्तम वठली, असे म्हणावे लागते. मुख्यमंत्र्यांऐवजी हवामान खात्याने जर अशा ढगफुटीची माहिती जाहीर केली असती तर प्रशासनाने खरोखरच एवढी तयारी केली असती का, हा प्रश्न मात्र तरीही पुढे येतोच. प्रशासनाच्या कार्यक्षमतेची खरेतर तीच एक आश्वासक बाब असते. काहीही झाले तरी आमचे प्रशासन हे जनतेला कोणतीही तोशीस लागू देणार नाहीत, ही खात्री जनतेच्या मनात येईल तो सुदिन.




