नाशिक | प्रतिनिधी | Nashik
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या (Student) विश्वासाचा फायदा घेऊन रशियन करन्सी (रुबल) एक्सचेंजच्या नावाखाली तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांची ठगबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित शुभम राकेश सिंग (रा. कमल रो-हाऊस, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हे देखील वाचा : Nashik NMC News : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आयुक्त दालनाबाहेर ठाकरे- शिंदे सेनेच्या पदाधिकार्यांमध्ये शाब्दिक वाद
फिर्यादी पृथ्वीराज पदमसिंह चांडे (वय २३, रा. चांदेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि शुभम सिंग हे दोघेही रशियातील (Russia) ‘चेपॉक्सरी युनिव्हर्सिटी’मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतात. शुभमने पृथ्वीराज व त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी, “मला युनिव्हर्सिटीने इंडियन करन्सीचे रशियन करन्सीमध्ये एक्सचेंज करण्यासाठी अधिकृत केले आहे,” असे सांगून एक बनावट अधिकारपत्र दाखवले. सुरुवातीला काही किरकोळ रकमेचे करन्सी एक्सचेंज करून देऊन त्याने त्यांचा पूर्ण विश्वास जिंकला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : परदेश दौऱ्याची डिजिटल रेकी; कंपनीच्या संचालकाला ५२ लाखांना घातला गंडा
यानंतर, त्याने नोव्हेंबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पृथ्वीराजकडून ७ लाख रुपये, त्याच्या ८ मित्रांचे ५३ लाख रुपये आणि युनिव्हर्सिटीतील इतर ८ विद्यार्थ्यांचे २ कोटी ८८ लाख रुपये, असे एकूण तीन कोटी ४८ लाख रुपये रक्कम रशियन करन्सीमध्ये (Russian Currency) बदलून मिळवण्यासाठी शुभमकडे सोपवले. मात्र, रक्कम हातात पडताच शुभमने करन्सी एक्सचेंज करून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही.
परीक्षा संपताच भारतात धाव
फसवणुकीच्या वेळी फिर्यादी आणि इतर विद्यार्थी रशियात होते आणि त्यांच्या परीक्षा सुरू होत्या. परीक्षा संपून भारतात परतताच फिर्यादी पृथ्वीराजने नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. इंदिरानगर पोलिसांनी २८ जुलै राेजी शुभम सिंगला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. फुंदे या तपास करत आहेत.
हे देखील वाचा : Shalarth ID Scam : पंधरा शाळांचे मुख्याध्यापक रडारवर; हृदयविकारामुळे गरुडची रुग्णालयातून चाैकशी




