पुणे । प्रतिनिधी Pune
कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये २१ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (९ सप्टेंबर) दुपारी बारा वाजता घडली. माया शेखर रेड्डी (वय २१, रा. हैदराबाद) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती भारती
विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, सध्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षेच्या तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज तिच्या भावाने पोलिसांकडे व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये एका महिलेने दहाव्या
मजल्यावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव यांच्यासह पोलीस हवालदार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल चोरमले आणि पोकळे घटनास्थळी दाखल झाले. तेथे २० ते २५ वयोगटातील एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. तिच्या शरीरातून रक्तस्राव
होत आसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याठिकाणी उपस्थित असलेल्या तिच्या भावाने ती आपली बहीण असल्याचे सांगत तिचे नाव माया शेखर रेड्डी सांगितले. ती नॅन्सी लेक होम सोसायटीतील फ्लॅटमध्ये भावासोबत राहत होती. तिचे कुटुंबीय मूळचे हैदराबाद, तेलंगणा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. भावाची पोलिसांनी चौकशी केली असता, माया हिचे कोणाशीही भांडण अथवा वाद झाल्याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले. सध्या तिच्या परीक्षा सुरू असल्याने अभ्यास आणि परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असावी, असा संशय त्याने व्यक्त केला. तसेच या घटनेबाबत कोणावरही संशय नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.




