नाशिक | प्रतिनिधी
स्वतःला गल्लीबोळातील ‘धुरंधर’ समजून रस्त्याच्या कडेला अड्डे जमवणारे, टवाळक्या करत दादागिरी मिरवणारे आणि रात्रीच्या अंधारात फूटपाथलाच ‘बार’ बनवणाऱ्या हौशा-नवशांची नाशिक पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे नाशिक शहर पोलिसांनी टवाळखोरांना थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला असून, हे नाशिक आहे, येथे रस्त्याच्या कडेला बसून मद्यपान चालणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे व किरणकुमार चव्हाण यांच्यासह सहायक आयुक्त संदीप मिटके हे पुन्हा बालेकिल्ला मोहिमेला बळ देत आहेत. त्यानुसार, मागील सहा महिन्यांत आतापर्यंत तब्बल ११ हजार ६८५ टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर केवळ चालू महिन्यातील विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन्स’मध्ये ४३८ टवाळखोरांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हे नाशिक आहे. येथे फूटपाथ बार नाहीत. येथे अंधारात रस्त्याच्या कडेला बसून मद्यपान करणे हा कायद्याचा भंग आहे,’ असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
…. आणि ‘धुरंधर’ पोलीस ठाण्यात एकत्र
सोशल मीडियावर पोलीस ठाण्याचा एक व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी टवाळखोरांची चांगलीच कोंडी केली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं चालतं, तर या व्हिडिओमध्ये आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात एकत्र बसलेले ते लोकही पाहा, ज्यांना कधीकाळी अगदी असंच वाटत होतं, अशा उपरोधिक आणि कडक शब्दांत पोलिसांनी भाईगिरी करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. चित्रपटात ‘धुरंधर’ चालत असला, तरी नाशिक शहरात फक्त आणि फक्त ‘कायदा’ चालतो, हे पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
नागरिकांकडून कौतुक
ThisIsNashik City आणि Kaydyacha Ballekilla या हॅशटॅगसह व्हायरल होत असलेल्या पोलिसांच्या या भूमिकेचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. रस्त्यावरील टवाळक्या आणि मद्यपींच्या त्रासामुळे महिला व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कनेक्शनमुळे आता नाशिकचे रस्ते रात्रीच्या वेळी सुरक्षित होऊ लागले आहेत. टवाळखोरांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांची ही धडक मोहीम अशीच सुरू राहावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.




