पुणे | प्रतिनिधी Pune
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळेविरोधात ११०० पानांचे आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री विशेष न्यायालयात सादर केले. पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या गुन्ह्याचा अवघ्या पंधरा दिवसांत तपास पूर्ण करून पन्नासहून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणीसह वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवाल आदी भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या गुन्ह्याचा कसून तपास करून आरोपीविरोधात पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्यानुसार, त्यांनी स्वतः रात्री उशिरापर्यंत न्यायालयात थांबून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष सरकारी वकील अजय मिसार, तपास अधिकारी निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह तपास पथकातील अधिकारी या वेळी उपस्थित होते.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी (१ मे) साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी काही तासांत आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) (अपहरण), ६४ व ६५ (बलात्कार), १०३ (खून), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणे), १४० (१) यांसह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले. आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याच्या घटनाक्रमाचा पंचनामा करण्यात आला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण व तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. पन्नासहून अधिक नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले. गुन्ह्याच्या आधी आरोपी आणि पीडितेला पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आले. त्यामध्ये परिसरात खेळणाऱ्या दहा ते अकरा वर्षे वयोगटातील तीन मुलांनी आरोपी पीडितेला गोठ्याकडे घेऊन जाताना पाहिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांची साक्ष महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. पीडित मुलीच्या शवविच्छेदन अहवालात आरोपीने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबल्याचे आणि तिच्या शरीरावर जखमा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यासमवेत सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणीसन्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे अहवाल, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावेही आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.




