मुंबई | Mumbai
‘इंडिया’ आघाडी’ (India Aaghadi) मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयकांना पाठिंबा देण्यावरून फूट पडल्याचे चित्र आहे. कारण इंडिया आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या द्रमुक (DMK) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) या पक्षांनी विधेयकांना पाठिंबा दिला आहे. उद्या सोमवार (दि. ३० नोव्हेंबर) रोजी लोकसभेत हे बिल मांडण्यात येणार आहेत. दरम्यान या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी सत्तेच्या दिशेने गेलेली पहिली टीम होती आणि आता राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेकडे रवाना झाली आहे. त्यामुळे शरद पवार म्हणजे धक्कातंत्र आहे”, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोला लगावला आहे. तसेच महिला आरक्षणाचे कारण पुढे करून हे सर्व सुरू असून, खासदारांची (MP) संख्या वाढवून नेमके काय साध्य करायचे आहे? सध्याचे ५४३ खासदार काय करत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
डिलिमिटेशन बिलामागे ‘केंद्रशासित’ करण्याचा डाव?
पुढे ते म्हणाले की, “राज्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळण्याऐवजी संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा भाजपचा (BJP) डाव आहे असा आरोप राज ठाकरेंनी केली. तसेच या प्रक्रियेमुळे भविष्यात ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ असा संघर्ष उभा राहण्याची भीती व्यक्त करत, दक्षिण आणि दख्खन (महाराष्ट्र) भागातील राज्यांवर मोठा अन्याय होईल, असेही त्यांनी म्हटले.
निवडणूक आयोग आणि मतदानाच्या आकडेवारीवर शंका
निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना राज ठाकरे यांनी २०१८ पासून आपण या मुद्द्यावर बोलत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३२ जागा मिळाल्या असल्या तरी वातावरण शांत का होते? असा प्रश्न करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अविश्वास व्यक्त केला. तसेच निवडणुकीच्या दिवशी शेवटच्या तासात मतदानाची टक्केवारी कशी काय वाढते, विशेषतः ठाण्यात एका तासात ८० ते ८५ हजार मतदान होणे कसे शक्य आहे? अशी विचारणाही राज ठाकरेंनी केली.
मराठवाडा आणि प्रकल्पांवरूनही निशाणा
तसेच सत्तेतून पैसा (Money) आणि पैशातून सत्ता हेच राजकारण सुरू असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी राज्यातील प्रकल्पांच्या निर्णयांवरही बोट ठेवले. केंद्राकडून राज्यातील प्रकल्पांवर नियंत्रण ठेवले जात असून, योग्य नियोजना अभावी भविष्यात मराठवाड्याचे वाळवंट होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत दिला.




