Sunday, November 29, 2026
Homeमहाराष्ट्रएम. के. स्टॅलिन, शरद पवारांच्या मनधरणीसाठी सोनिया, राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खर्गे...

एम. के. स्टॅलिन, शरद पवारांच्या मनधरणीसाठी सोनिया, राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खर्गे मैदानात; थेट विमानाने…, डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?

नवी दिल्ली | New Delhi

महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयके उद्या, सोमवार (दि. ३० नोव्हेंबर) रोजी लोकसभेत मांडण्यात येणार आहेत. या विधेयकांना केंद्र सरकारला आवश्यक संख्याबळ मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत मात्र फूट पडल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या द्रमुक (DMK) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) या विधेयकांना पाठिंबा दर्शवल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. या दोन्ही मित्रपक्षांची मनधरणी करण्यासाठी आज (रविवारी) काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे विशेष विमानाने चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.

सत्ताधाऱ्यांचे पारडे जड, मित्रपक्षांचा पाठिंबा

केंद्र सरकार उद्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात संविधान (१३२ वी दुरुस्ती) विधेयक, २०२६ यासह तीन महत्त्वाची विधेयके सादर करणार आहे. द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वायएसआरसीपी आणि बीआरएस या पक्षांनी विधेयकांना हिरवा कंदील दाखवल्याने सरकारचा मार्ग सुकर झाला आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत द्रमुक खासदारांनी स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी केल्यानंतर सचिवालयाने त्यांच्या बसण्याच्या जागेत बदल केला असून, आता खासदार सुप्रिया सुळे आणि कनिमोझी या एकत्र बसणार आहेत.

काँग्रेस नेते आज स्टॅलिन, शरद पवारांची भेट घेणार

मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी आणि इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस नेते आज (रविवार) दुपारी चेन्नईत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. चेन्नईतील बैठकीनंतर हे सर्व नेते सायंकाळी मुंबईत दाखल होणार असून, रात्री ८.४५ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

शरद पवार गटाचे दोन खासदार अधिवेशनाला अनुपस्थित

दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्याच्या संसदीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांच्यासोबतच पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे हे देखील आजारी असल्याने अधिवेशनाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी लोकसभेत काय घडणार?

कामकाजाच्या सुरुवातीला सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल आणि आसाममधील नगाँवचे खासदार देवाशिष शर्मा यांचा शपथविधी पार पडेल. यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि अमित शाह हे जुनी परिसीमन व केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयके मागे घेतील. त्यानंतर सुधारित ‘द डिलिमिटेशन (सेकंड) बिल, २०२६’, ‘द युनियन टेरिटरीज लॉज (अमेंडमेंट) सेकंड बिल, २०२६’ आणि ‘संविधान (१३२ वी दुरुस्ती) विधेयक, २०२६’ ही तिन्ही विधेयके सभागृहात मांडली जातील. ही तिन्ही महत्त्वाची विधेयके उद्याच चर्चेला घेऊन संमत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे.

ताज्या बातम्या

Raj Thackeray : “शरद पवार म्हणजे धोकायंत्र, राष्ट्रवादीची दुसरी टीम…”; डिलिमिटेशनवरून...

0
मुंबई | Mumbai ‘इंडिया’ आघाडी' (India Aaghadi) मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयकांना पाठिंबा देण्यावरून फूट पडल्याचे चित्र आहे....