नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
नाशिक जिल्हा नियोजन समितीची ही बैठक एक महत्त्वाची संधी होती; पण प्रशासकीय गांभीर्याचा अभाव, निधी वळवण्यासारखे गंभीर आरोप आणि नेतृत्वातील जाणवलेली उदासीनता यामुळे ती केवळ सोपस्कार ठरल्याची भावना निर्माण झाली आहे. मंत्री व आमदार यांच्या तक्रारी व संतापानंतरही अधिकारी वर्गाला पाठीशी घातले जाणार असेल तर भविष्यात या घटकांमधील विसंवाद विकास प्रक्रियेच्या मुळाशी येईल, ही भीती आहे.
तब्बल अडीच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक नियमित पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अखेर पार पडली. विकासाच्या महत्त्वाच्या मुद्यांवर गांभीर्याने चर्चा होईल, रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि निधी वाटपातील त्रुटी दूर होतील, अशी अपेक्षा या बैठकीकडून बाळगली जात होती. गेल्याच आठवड्यात पडसाद या सदरात या बैठकीची घटनात्मक गरज आणि विकासाची प्रक्रिया यासंदर्भात उहापोह केला होता. त्यानुसार बैठकीचे आयोजन झाले खरे; पण प्रत्यक्ष बैठकीत दिसून आलेले चित्र अत्यंत निराशाजनक आणि प्रशासकीय उदासीनता, हडेलहप्पी आणि गोंधळाचे दर्शन घडवणारे होते. अनेक लोकप्रतिनिधी आणि निरीक्षकांच्या मते, ही बैठक म्हणजे केवळ औपचारिकता किंवा सोपस्कार उरकण्याचा प्रकार ठरला.
जिल्हा नियोजन समिती ही कोणत्याही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असते. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, कृषी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या अनेक क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन माध्यमातून निधी मंजूर केला जातो आणि त्याचे योग्य नियोजन होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या अडीच वर्षांत ही बैठक न झाल्याने जिल्ह्यातील अनेक विकासकामे रखडली, निधीच्या विनियोगाबाबत संभ्रम निर्माण झाला आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या प्रदीर्घ कालावधीत जिल्हा नियोजन अधिकार्याच्या कारभाराबद्दल लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता साचलेली होती.
या अस्वस्थतेचा स्फोट या बैठकीत झाल्याचे पाहायला मिळाले. नांदगावचे आमदार सुहास कांदे वगळता जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन अधिकार्याच्या कामकाजावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. विशेष म्हणजे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तोंडसुख घेतले. जिल्हा नियोजन अधिकार्याने कशी कलाकारी केली, या शब्दात मंत्री भुसेंनी पुरावेच सादर करून या विभागाचा बुरखाच फाडला. शिक्षणासाठीचा निधी कागदोपत्री कमी दाखविल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. शिक्षणासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद असताना संबंधित अधिकार्याने जाणीवपूर्वक निधी वळविल्याचा आरोपही त्यांनी केला.
अडीचशे कोटींचा निधी अपेक्षित असताना केवळ साडेबारा कोटींची तरतूद केली गेली. याप्रकरणी जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण विभागाच्या निधीबाबत समोर आलेला आरोप. सार्वजनिक निधीचा वापर मंजूर उद्दिष्टांसाठी आणि योग्य प्रक्रियेनुसार होणे हा प्रशासकीय शिस्तीचा पाया असतो. मात्र, संबंधित विभागाचा निधी परस्पर दुसरीकडे वळवला जात असेल, तर ती केवळ तांत्रिक चूक न राहता प्रशासकीय दांडगाई आणि नियमांची पायमल्ली ठरते. यावरून जिल्हा नियोजन स्तरावर किती मनमानी सुरू आहे, याची प्रचिती येते. असा प्रकार घडत असताना त्यावर वेळीच नियंत्रण का राहिले नाही, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
आमदार किशोर दराडे यांनी तर सर्वच अधिकारी वर्गावर तोंडसुख घेत, शासकीय कार्यक्रमात आपल्याला कसे डावलले जाते, याचे उदाहरण दिले. दराडे व भुजबळ यांचा येवला तालुयातील राजकीय संघर्ष सर्वांना माहीत असल्याने यातील मर्म सर्वांना कळले; पण अधिकार्यांनी असे करणे हा प्रशासकीय शिस्तीचा व राजशिष्टाचाराचाही भंग होतो, हे या मंडळींना समजत नाही की आपले काही होऊ शकत नाही, असा गर्व या मंडळींना झाला आहे, हे न कळे. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळणे, फायलींचा रेंगाळलेला निपटारा आणि समन्वयाचा अभाव या गोष्टींमुळे लोकप्रतिनिधी कमालीचे वैतागलेले होते. जेव्हा लोकप्रतिनिधींनाच आपल्या मतदारसंघातील कामांच्या प्रगतीची ठोस माहिती मिळत नाही, तेव्हा प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्न निर्माण होतो.
बैठकीतील वातावरणात केवळ एका अधिकार्यापुरतीच नाराजी मर्यादित नव्हती, तर सर्वोच्च प्रशासकीय नेतृत्वाच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हेदेखील या बैठकीत फारसे गंभीर दिसून आले नाहीत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी या नात्याने नियोजन बैठकीत ठोस भूमिका घेणे, प्रत्येक विभागाचा आढावा काटेकोरपणे घेणे आणि लोकप्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करणे अपेक्षित असते. परंतु आवश्यक ती गांभीर्याची पातळी न दिसल्याने आमदार डॉ. राहुल आहेर यांनी तर भर सभेत संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींचा हा संताप केवळ वैयक्तिक नाराजीतून आलेला नव्हता, तर जनतेच्या प्रश्नांप्रती जाणवणारी हतबलता आणि प्रशासकीय शिथिलतेविरुद्धची प्रतिक्रिया होती, हे पालकमंत्र्यांनीही समजून घ्यायला हवे.
दुसरीकडे, पालकमंत्र्यांची भूमिकाही या बैठकीत म्हणावी तितकी प्रभावी आणि गंभीर जाणवली नाही. पालकमंत्री हे जिल्ह्याच्या विकासाचे मुख्य सूत्रधार मानले जातात. प्रशासनावर वचक ठेवणे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद साधणे आणि रखडलेल्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेणे ही पालकमंत्र्यांची प्रमुख जबाबदारी असते. मात्र, या बैठकीत अपेक्षित ठामपणा आणि गांभीर्य न दिसल्याने बैठकीचा उद्देशच काहीसा झाकोळला गेला. अधिकारी वर्गाबरोबर नको इतकी सलगी ही अलीकडच्या नेत्यांची खासियत बनून गेली आहे. अशाने मंत्री वा बड्या नेत्यांचा अधिकारी वर्गावर धाक राहत नाही. मंत्र्यांबरोबर हास्यविनोदात रमणे अपवादात्मक अनौपचारिक परिस्थितीत ठीक; पण अशा प्रशासकीय बैठकीत शिष्टाचार पाळणे हे दोन्ही घटकांकडून अपेक्षित असते. नोकरशाहीबरोबर सौहार्दाचे संबंध असणे वेगळे आणि मित्रत्वाच्या नात्याने हशा-टाळ्यांत रमणे वेगळे.
अशाने प्रशासकीय गांभीर्याचीच ऐसीतैशी होऊन जाते. दुर्दैवाने याचा अनुभव या बैठकीत आल्यामुळे त्याची दखल घ्यावी लागली. अर्थात, आमदार सुहास कांदे यांनी मात्र सर्वच अधिकार्यांची भलामण करून वेगळाच सूर लावला. हा त्यांचा व्यक्तिगत अनुभव असला तरी त्याला गेल्या सभेत त्यांनी घेतलेला रुद्रावतार तर कारणीभूत नाही ना, असा चिमटा दादा भुसेंनी घेतला. त्यातून उपस्थितांना कळायचे ते कळले. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी बळीराजाच्या समस्या अत्यंत पोटतिडीकेने मांडल्या. ग्रामीण भागातील विजेची समस्या हे तर जणू सार्वत्रिक संकट असल्यासारखे अनेकांच्या बोलण्यातून जाणवले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबतही सर्वांनी अनेक सूचना केल्या.
ग्रामीण पोलिसांच्या खंडणीखोरीच्या प्रवृत्तीवर खासदार भास्कर भगरेंसह काही आमदारांनी ताशेरे ओढले. शहरातील सिंहस्थाच्या कामांची गती वाढविण्याबाबत आमदार राहुल ढिकले यांनी मुद्दा उपस्थित केला. उपमहापौर विलास शिंदे यांनीही मिसिंग लिंकचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली. आमदार सीमा हिरे यांनीही निधींविषयीच्या तांत्रिक अडचणींचा कसा बाऊ केला जातो याचा पाढा वाचला. किती निधी आहे, याचीही माहिती आम्हाला कळत नाही, असा आरोपही त्यांनी केला. दूषित पाण्याचा ज्वलंत प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सिंहस्थ समोर असताना सध्या नाशिक शहरात जे काही चालले आहे, त्याचे उत्तरदायित्व कोणाकडे असा प्रश्न उभा राहतोच. याच आठवड्यात सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी तर सिंहस्थ आयुक्त शेखरसिंह यांच्यावर आरोपांचा भडीमार केला. सिडको विभागातील एकही रस्ता सिंहस्थ कामात धरलेला नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करून याबद्दल अधिकारी ऐकूनही घ्यायला तयार नाहीत, अशी व्यथा व्यक्त केली. या बैठकीतही साधारण असाच सूर प्रशासनाविरोधात सर्वच लोकप्रतिनिधींचा होता.
अडीच वर्षांनी होणार्या बैठकीत किमान मागील कालावधीतील कामांचा सविस्तर लेखाजोखा, निधी खर्चाची स्थिती, प्रलंबित प्रस्तावांचा आढावा आणि पुढील कालावधीचे स्पष्ट नियोजन मांडले जाणे गरजेचे होते. त्याऐवजी वाद, आरोप-प्रत्यारोप आणि नाराजीच्या सुरातच वेळ गेल्याचे चित्र दिसले. ‘पडसाद’ सदरातून मांडलेल्या भूमिकेनुसार बैठक पार पडली, पण ती केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यापुरतीच मर्यादित राहिली, अशी भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. अर्थात, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वच विषयांची दखल घेऊन अनेक निर्णय घेतले. या अवघड काळात कोणत्या मुद्याला प्राधान्य द्यायचे याची जंत्रीच त्यांनी वाचून दाखविली. अधिकार्यांनी व्यवस्थित कामकाज करावे; अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला खरा, पण त्या तुलनेत लोकप्रतिनिधींच्या संतापाची तीव्रता अधिक होती. जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या संदर्भात महाजनांनी काही भाष्य केले नाही. जिल्हाधिकार्यांनीही अप्रत्यक्षरीत्या त्यांचीच बाजू लावून धरल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता कायम राहिली.
नाशिक जिल्ह्याला विकासाच्या अनेक संधी आहेत. शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि शहरीकरण अशा विविध आघाड्यांवर जिल्ह्याची वेगाने वाटचाल सुरू आहे. अशा जिल्ह्यात नियोजन प्रक्रियेत शिस्त, पारदर्शकता आणि गांभीर्य असणे अत्यंत आवश्यक आहे. निधीचे योग्य नियोजन झाले नाही, तर त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. शाळांच्या गरजा, आरोग्य सुविधा, स्थानिक पायाभूत कामे यांसारख्या गोष्टी रखडल्यास त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम दीर्घकाळ जाणवतात. केवळ अडीच वर्षांनी बैठक घेऊन प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यानंतर होणार्या पाठपुराव्यात सातत्य आणि प्रामाणिकपणा असायला हवा. निधी परस्पर वळवण्यासारख्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका नियमितपणे आणि ठराविक कालावधीत होणे गरजेचे आहे; जेणेकरून प्रश्नांचा डोंगर साचणार नाही.
थोडयात सांगायचे तर, नाशिक जिल्हा नियोजन समितीची ही बैठक एक महत्त्वाची संधी होती; पण प्रशासकीय गांभीर्याचा अभाव, निधी वळवण्यासारखे गंभीर आरोप आणि नेतृत्वातील जाणवलेली उदासीनता यामुळे ती केवळ सोपस्कार ठरल्याची भावना निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न खर्या अर्थाने सोडवायचे असतील, तर या बैठकीतून केवळ नाराजी न नोंदवता प्रशासकीय जबाबदारी, पारदर्शकता आणि ठोस कृती आराखड्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल. अन्यथा, नियोजनाच्या नावाखाली होणारे असे सोपस्कार नाशिकच्या विकासाचा वेग मंदावतील, यात शंका नाही.
मो.९३२५३८३०९२




