Sunday, November 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : विमानात बसण्याआधी राहुल गांधींची स्टॅलिन यांना 'भाऊ' म्हणत भावनिक...

Rahul Gandhi : विमानात बसण्याआधी राहुल गांधींची स्टॅलिन यांना ‘भाऊ’ म्हणत भावनिक साद; तर स्टॅलिन यांचा ‘कट्टाबोम्मन आणि एट्टप्पन’चा संदर्भ देत प्रतिसाद

नवी दिल्ली | New Delhi

उद्यापासून (दि.३० नोव्हेंबर) रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारतर्फे मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार आहे. घटनादुरुस्ती स्वरूपाचे हे विधेयक संमत करण्यासाठी लोकसभेत ३६० खासदारांच्या मतांची आवश्यकता असून, त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. या विधेयकाला द्रमुक (DMK) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, विरोधकांची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीचे शिष्टमंडळ आज (रविवारी) चेन्नईला रवाना झाले आहेत.

- Advertisement -

राहुल गांधींची स्टॅलिन यांना साद

चेन्नईकडे प्रयाण करण्यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना भावनिक साद घातली. स्टॅलिन यांचा ‘भाऊ’ असा उल्लेख करत ते नेहमीच तमिळविरोधी शक्तींविरोधात खंबीरपणे उभे राहिल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या जागा वाढवून ८५० केल्यास लोकशाही धोक्यात येईल आणि भाजप-आरएसएसला निवडणुकीचा नकाशा बदलण्याची संधी मिळेल, असा आरोपही त्यांनी केला. देश, तामिळनाडू आणि संविधानाच्या रक्षणासाठी या विधेयकाला एकत्र येऊन विरोध करावा, अशी विनंती ते आणि इंडिया आघाडीचे नेते स्टॅलिन यांना करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर आणि ‘कट्टाबोम्मन-एट्टप्पन’चा उल्लेख

राहुल गांधी यांच्या पोस्टनंतर एम. के. स्टॅलिन यांनीही सोशल मीडियावरून तातडीने प्रतिक्रिया देत द्रमुकच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. तामिळनाडू आणि येथील जनतेचे हित हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, राज्याचे अधिकार आणि संघराज्य व्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्टॅलिन यांनी ठामपणे सांगितले आहे. तसेच आपल्या विधानात त्यांनी “इतिहास आम्हाला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही,” असा उल्लेख केला आहे.

‘कट्टाबोम्मन’ आणि ‘एट्टप्पन’ संदर्भाचा अर्थ काय?

स्टॅलिन यांनी वापरलेल्या या दोन ऐतिहासिक नावांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. यातील वीरपांडिया कट्टाबोम्मन हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वाभिमानाने आणि खंबीरपणे लढा देणारे शूर योद्धा म्हणून ते ओळखले जातात. संघर्ष आणि स्वाभिमानाचे हे प्रतीक मानले जाते. तर एट्टप्पन यांना कट्टाबोम्मन यांना पकडण्यात मदत केल्याचा संदर्भ या नावाशी जोडला जातो, त्यामुळे तमिळ राजकीय व सांस्कृतिक संदर्भात ‘एट्टप्पन’ हे विश्वासघाताचे प्रतीक मानले जाते.

द्रमुक भूमिकेवर ठाम राहणार?

दरम्यान तामिळनाडूच्या हितासाठी आणि दिलेल्या भूमिकेसाठी द्रमुक ठाम राहिल्याचा आणि कोणताही विश्वासघात करणार नसल्याचा सूचक संदेश स्टॅलिन यांनी यातून दिल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, यापूर्वी द्रमुकने दिलेला शब्द मोडून गद्दारीचा शिक्का घेणार नसल्याचे संकेत दिल्याने, चेन्नईतील भेटीनंतर स्टॅलिन नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Raj Thackeray : “शरद पवार म्हणजे धोकायंत्र, राष्ट्रवादीची दुसरी टीम…”; डिलिमिटेशनवरून...

0
मुंबई | Mumbai ‘इंडिया’ आघाडी' (India Aaghadi) मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयकांना पाठिंबा देण्यावरून फूट पडल्याचे चित्र आहे....