Thursday, August 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजि. प. शिक्षण विभागाची सीईओंकडून अचानक पाहणी; ९ कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन...

जि. प. शिक्षण विभागाची सीईओंकडून अचानक पाहणी; ९ कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आज जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागास अचानक भेट देऊन विभागीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, दैनंदिन कामकाज तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांशी संबंधित कामांचा आढावा घेतला.

पाहणीदरम्यान ९ कर्मचारी यांनी कार्यालयीन उपस्थितीची हजेरी नोंदविलेली नसल्याचे निदर्शनास आले. कार्यालयीन शिस्त, वेळेचे पालन आणि प्रशासकीय कामकाजातील जबाबदारी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत संबंधित ९ कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांनी दिले. शासकीय कार्यालयातील उपस्थिती व वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींची सुरक्षितता, वर्गखोल्यांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्तीची कामे, प्रस्तावित बांधकामे तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

शाळा इमारतींची दुरुस्ती व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घ्यावी, असे निर्देश पवार यांनी दिले. ज्या शाळांमध्ये इमारती किंवा वर्गखोल्यांची स्थिती धोकादायक आहे, अशा ठिकाणी तातडीने आवश्यक कार्यवाही करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, संबंधित प्रस्तावांची तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करावी आणि आवश्यकतेनुसार कामांना प्राधान्यक्रम निश्चित करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळी आढावा संध्याकाळी पदोन्नती : शिक्षण विभागातील प्रतिक्षायादीतील ८ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आज सकाळी दिल्या. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आजच सायंकाळी या ८ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिली, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिलेल्या निर्देशांमुळे त्याच दिवशी पदोन्नती झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्या

नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर...