अकोले |प्रतिनिधी| Akole
भंडारदरा धरणातून रविवारी सकाळी 11-30 वाजता वीज निर्मिती केंद्रातून 815 क्युसेक्सने नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्ग सोडतेवेळी धरणात 10 हजार 987 दलघफू पाणी शिल्लक होते. भंडारदर्याच्या लाभ क्षेत्रासाठी निळवंडे धरणातून सुरु असणारे आवर्तन 41 दिवसा नंतर संपले. या आवर्तनात निळवंडे धरणातील 4587 दलघफू पाण्याचा वापर झाला निळवंडे चे आवर्तन सुरु असतांना भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला नव्हता. त्यामुळे निळवंडे धरणाची पाणी पातळी कमी होत गेली.
पाणी पातळी कमी झाल्यामुळे अकोलेसाठी असणारे उच्चस्तरीयचे आवर्तन बंद पडले. निळवंडे धरणातील पाणी पातळी वाढविण्यासाठी भंडारदरा धरणातून आवर्तन सुरु करावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. भंडारदर्याचे आवर्तन सुरु झाल्यामुळे निळवंडे धरणाची पाणी पातळी आता हळूहळू वाढत जाईल. त्यामुळे उच्चस्तरीय कालव्याचे आवर्तन सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.




