
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
शासनाद्वारे दिल्या जाणार्या मदत व सानुग्रह अनुदान वाटपात नियमबाह्य कामकाज करून लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील फरार महिला तलाठी राहुरी पोलिसांना शरण आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आणि राहुरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर, मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांच्या फिर्यादीवरून एप्रिल 2026 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, तलाठी मंगल रूपचंद गुसिंगे या राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना, मदत व पुनर्वसन विभागाच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती.
चौकशी अहवालानुसार, सन 2022 ते 2023 या कालावधीत तलाठी मंगल गुसिंगे यांनी नियमबाह्य पद्धतीने एकूण 3 लाख 65 हजार 340 रुपयांचे अनुदान वितरित केल्याचे निष्पन्न झाले. यात शासनाची फसवणूक, विश्वासघात व आर्थिक नुकसान असे गंभीर आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला.
याशिवाय, तलाठी गुसिंगे यांनी जालना जिल्ह्यातील काही अधिकार्यांच्या संगनमताने तेथेही 12 लाख 24 हजार 802 रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्या फरार होत्या. अखेर 5 सप्टेंबर 2026 रोजी सदर महिला तलाठी राहुरी पोलीसांना शरण आल्या असून पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व पोलीस नाईक गणेश लिपणे करत आहेत.




