मनमाड | प्रतिनिधी Manmad
एकीकडे पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात होत असलेली घसरण अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. पंधरा दिवसाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे ७५० रुपयांची घसरण झाली. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या भावात होत असलेली घसरण पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कांदा हे जिल्ह्यातील नगदी पिक मानले जात असल्याने मनमाडसह जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात.यंदा खरीप हंगामात हजारो हेटरवर कांद्याची लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर पावसाने दडी मारली त्यामुळे पाहिजे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. जे उत्पन्न आले त्याला बाजारभाव मिळत नसल्याने हा कांदा शेतकर्यांनी चाळीत साठवून ठेवला होता. गेल्या दोन महिन्यापासून कांद्याच्या भावात सुधारणा होऊन चांगला भाव मिळत असल्याचे पाहून शेतकर्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीस आणण्यास सुरुवात केली.
एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत असल्याचे पाहून शेतकर्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झालेले असताना दुसरीकडे कांद्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड सुरु झाली त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार ने नाफेड आणि एनसीसीएफ यांनी खरेदी करून ठेवलेल्या बफर स्टॉक मधून कांदा बाजारात आणला, केंद्र शासनाने इजीप्तमधून देखील कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले होते मात्र एवढं करून देखील आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात पुन्हा वाढ होऊन कांद्या प्रती क्विंटल ५ हजार पर्यत भाव मिळाला होता
मात्र, आता पुन्हा कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरु झाली आहे पंधरा दिवसा पूर्वी कांद्याला कमीतकमी १५०० तसेच जास्तीतजास्त भाव ५१०० दर मिळाला होता. हा सरासरी दर ४५०० रुपये होता. आज त्याच कांद्याला कमीतकमीत १००० रुपये, जास्तीतजास्त ४२०० भाव रुपये तर सरासरी भाव ३७५१ रुपये मिळाला. सरासरी भावात क्विंटल मागे ७५० रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी, दसरा सण तोंडावर आले असतांना अशा वेळी कांद्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कर्नाटक आणि मध्यप्रदेशात नवीन कांदा येण्यास सुरुवात झाली त्यामुळे तेथे मागणी कमी झाली आहे.शिवाय नवरात्री काळात कांद्याचा वापर कमी केला जातो त्यामुळे देखील किरकोळ बाजारात मागणी कमी झाली त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होत आहे.
बंटी चोपडा, कांदा व्यापारी




