Wednesday, November 4, 2026
HomeनाशिकNashik Dindori Crime : शस्त्रांचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा! सहा दरोडेखोरांनी वृद्ध...

Nashik Dindori Crime : शस्त्रांचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा! सहा दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला ओलीस धरत सात लाखांचा ऐवज लुटला

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील गणोरवाडी (Ganor Wadi) येथे सहा अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी (Robbers) एका घरावर धाडसी दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवून तब्बल ७ लाख १० हजार २५० रुपयांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तलवार, लोखंडी कोयता आणि छऱ्यांच्या बंदुकांसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी घरात घुसून दाम्पत्याला ओलीस धरले. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दुचाकी घेऊन त्यांनी पोबारा केला.

- Advertisement -

मिळालेल्या पोलीस माहितीनुसार, सोमवार (दि.२ नोव्हेंबर) रोजी रात्री ७.४५ ते १० वाजेदरम्यान गणोरवाडी येथील शेतगट क्रमांक ६४ मध्ये ही घटना घडली. संजय भास्कर पिंगळ (वय ५९) हे पत्नी निर्मला यांच्यासह घरी (House) असताना सहा अज्ञात दरोडेखोर त्यांच्या घरासमोर आले. त्यांच्यापैकी चौघांनी संजय पिंगळ यांना, तर दोघांनी त्यांच्या पत्नीला पकडून तलवार, चाकू व कोयत्याचा धाक दाखवला.

त्यानंतर घरात अनधिकृत प्रवेश करून कपाट, शोकेस, पलंग तसेच दाम्पत्याच्या अंगावरील दागिने जबरीने लुटले. या दरोड्यात अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे ११.५ तोळे सोन्याचे दागिने, ३५ हजार २५० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, १ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि ४५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल असा ऐवज लंपास करण्यात आला. विशेष म्हणजे, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा (CCTV Camera) डीव्हीआरदेखील दरोडेखोरांनी सोबत नेला. एकूण ७ लाख १० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

दाम्पत्याला खोलीत कोंडून बाहेरून लावली कडी

दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी संजय पिंगळ आणि त्यांच्या पत्नीला घरातील एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावली. त्यामुळे त्यांना तातडीने बाहेर पडता आले नाही. मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी चोरीस गेलेल्या मालाची खात्री करून यादी तयार केली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात आली आहे. ई-साक्ष प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

परिसरात भीतीचे वातावरण, गुन्हा दाखल

दरम्यान, अद्याप कोणताही मुद्देमाल हस्तगत झालेला नसून आरोपींची ओळख पटलेली नाही. या धाडसी दरोड्यामुळे गणोरवाडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३१२, ३३१(६), १२७(२) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

IND vs NZ : भारताची न्यूझीलंडवर ५ गडी राखून मात; विराटच्या...

0
नवी दिल्ली | New Delhi भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून (दि.०४ नोव्हेंबर) पासून ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ऑकलंड येथील ईडन पार्क...