मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पक्षांतर्गत मतभेद आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेताना कोअर कमिटीतील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याची भूमिका खासदार पार्थ पवार यांनी बैठकीत मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीत भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून झालेल्या या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ‘देवगिरी’वर बैठकांचा सिलसिला सुरु झाला. मंगळवारी आमदारांची बैठक झाल्यानंतर आज सकाळी कोअर कमिटीची बैठक झाली.
या बैठकीत पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडी, अलीकडे करण्यात आलेल्या नियुक्त्या आणि संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली. बैठकीत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अलीकडे केलेल्या विविध नियुक्त्यांबाबत काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तरीही सध्या करण्यात आलेल्या नियुक्त्या कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता मुंबई अध्यक्ष म्हणून झिशान सिद्धिकी आणि पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून उमेश पाटील यांच्या करण्यात आलेल्या नियुक्तीबाबत बैठकीत चर्चा झाली. पुढील सहा महिने या दोघांनाही या पदावर संधी देण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पार्थ पवार यांनी बैठकीत मांडल्याचे समजते.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या यादीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने त्याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. या दोन्ही पदांबाबत निवडणूक आयोगाला पक्षाकडून अद्याप कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. या विषयावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.




