Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : कायद्याचा बालेकिल्ला ढासळू लागला…

पडसाद : कायद्याचा बालेकिल्ला ढासळू लागला…

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

सध्या शहरात पोलिसांनी टवाळखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडली असली व त्यांची त्या त्या कार्यक्षेत्रात धिंड काढली जात असली तरीही टवाळखोर व टपोरी पोरांचा उच्छाद काही कमी व्हायला तयार नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे दिसते. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी आणि टवाळखोरी मोडून काढण्यासाठी विविध कारवायांचे प्रयत्नांसह दावे निश्चितपणे केले जात आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती मात्र त्यानंतरही वेगळीच भासत आहे. शहरात पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांच्या मुसया आवळण्याच्या कारवाया होत असूनही समाजातील अशा प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक किंवा धाक आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

अलिकडे पोलिसांनी ओपन बार म्हणजेच उघड्यावर मद्यालये खोलून बसलेल्यांवरही बर्‍याच कारवाया केल्या, ही वस्तुस्थिती नाकारता येत नसली तरी पुढचे पाठ अन् मागचे सपाट असा अनुभव येत आहे. शहरातील चौकाचौकांत, रात्रीच्या वेळी बंद असणार्‍या दुकानांबाहेर, तसेच निवासी आणि व्यावसायिक संकुलांच्या पायर्‍यांवर टवाळखोरांनी आपले नवे ‘अड्डे’ आणि ‘ओपन बार’ थाटले आहेत. अंधारे कोपरे तर या हुल्लडबाजांचे हक्काचे ठिकाण बनले आहेत. तिथे खुलेआम मद्यपान केले जाते, मोठ्या आवाजात गाणी लावली जातात आणि अश्लील भाषेचा सर्रास वापर केला जातो. यामुळे रात्रीच्या वेळी जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडणार्‍या ज्येष्ठ नागरिक व महिलांना या परिसरातून फिरणे असुरक्षित आणि मन:स्ताप देणारे ठरत आहे. अश्लील शेरेबाजी आणि हुल्लडबाजीमुळे सामान्य माणसाला आपला रस्ता बदलण्याची किंवा घरातच बसून राहण्याची वेळ आली आहे.

या वाढत्या उपद्रवावर काही पोलिसांची भूमिका ही केवळ दिखाऊ स्वरूपाचीच नव्हे तर संशयास्पदही वाटू लागली आहे. नागरिकांचा थेट आक्षेप आहे की, पोलीस आता ‘सायरन’ संस्कृतीचे पाईक झाले आहेत. गस्तीवर असलेले पोलीस येतात, केवळ गाडीचा सायरन वाजवतात आणि निघून जातात. कोणतीही प्रत्यक्ष किंवा ठोस कारवाई केली जात नाही. टवाळखोरही या ‘फॉर्मालिटी’ला सरावले आहेत; ते केवळ पोलिसांची गाडी जाण्याची वाट पाहतात आणि ती दिसेनाशी होताच पुन्हा आपला उच्छाद मांडतात. दुसरीकडे, पोलीस प्रशासनाकडून दरमहा शेकडो टवाळखोरांवर कारवाई केल्याचे आकडे जाहीर करून ‘आकडेवारीचा फुगा’ फुगवला जातो.

गेल्या सहा महिन्यांत तब्बल १२,००० हुल्लडखोरांवर कारवाई करण्यात आल्याचे आणि केवळ जून महिन्यात ४३८ जणांना ‘दंडुका प्रसाद’ दिल्याचे कागदावर तरी खूप मोठे आणि प्रभावी दिसते. काही ठिकाणी पोलिसांकडून टवाळखोरांची धिंड काढून जाहीर माफीनामाही घेण्यात आला, जेणेकरून त्यांची दहशत मोडून काढता येईल. परंतु, वास्तवात या कारवाईचा ‘डोस’ या प्रवृत्तीला प्रभावीपणे लागू पडलेला आढळत नाही. कारवाईनंतरही दुसर्‍या दिवसापासून त्यांचा नित्यक्रम तसाच सुरू राहतो, ज्यामुळे पोलिसांच्या या कारवाईच्या गांभीर्यावर आणि त्यांच्या धाकावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या समस्येचा सर्वात गंभीर आणि विदारक पैलू म्हणजे, या टवाळखोरीत आणि हुल्लडबाजीत आता तरुणींचा आणि ‘विधिसंघर्षित बालकांचा’ वाढता सहभाग दिसून येत आहे. ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण राहिलेली नाही, तर ती एक भयंकर ‘सामाजिक कीड’ बनली आहे. कुटुंबातील संस्कारांचा अभाव, सोशल मीडियाचा अतिरेक आणि त्यावरील चुकीच्या गोष्टींचे आकर्षण, तसेच स्वस्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आजची नवी पिढी गुन्हेगारीच्या या दलदलीकडे ओढली जात आहे. हा ट्रेंड असाच राहिला तर भविष्यात समाज आणि प्रशासनाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. या सर्व परिस्थितीत न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय पातळीवरील विसंगती पीडितांची अधिकच कोंडी करीत आहे.

आपत्कालीन स्थितीत ‘डायल ११२’ वरून संपर्क साधल्यास पोलिसांचा मिळणारा तत्काळ प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद असतो; काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचतात. परंतु, पीडित व्यक्तीचा खरा संघर्ष आणि मन:स्ताप त्यानंतर सुरू होतो. जेव्हा नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जातो, तेव्हा एफआयआर किंवा अदखलपात्र गुन्हा नोंदवताना होणारी अक्षम्य दिरंगाई, जाबजबाब देण्यातील वेळकाढूपणा आणि तपासात होणारा विलंब यामुळे न्याय मिळण्याची आशा मावळू लागते. अनेकदा तर पोलिसांकडूनच सामोपचाराने प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला जातो. ही दिरंगाई आणि तडजोडीची मानसिकता गुन्हेगारांचे मनोबल वाढवणारी ठरते. थोडयात सांगायचे तर, केवळ कागदावरील आकडेवारीने किंवा सायरनच्या आवाजाने शहरातील टवाळखोरी थांबणार नाही.

या सामाजिक आणि प्रशासकीय समस्येवर मात करण्यासाठी पोलिसांना आपल्या कारवाईत सातत्य आणि खर्‍या अर्थाने कठोरता आणावी लागेल. तर दुसरीकडे, समाजाने आणि पालकांनीही आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार करत त्यांना या हुल्लडबाजीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आत्मपरीक्षण करणे आणि पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्त संदीप कर्णिक व त्यांच्या चमूने गुन्हेगारांची गठडी वळताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला केला होता. हळूहळू हा बालेकिल्ला ढासळू लागला आहे. वेळीच त्याकडे लक्ष दिले आणि मोठ्या कष्टाने तयार केलेला हा बालेकिल्ला शाबूत ठेवला तरच शहरात पुन्हा शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकेल.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...