नाशिक
नाशिकचे पक्षी मानचिन्ह निश्चित करण्यासाठी ‘आपलं पर्यावरण’ संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी कावळा आणि गिधाड हे दोन पर्याय नागरिकांसमोर ठेवण्यात आले होते. पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून ऑनलाइन मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून किंवा ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून आपल्या पसंतीच्या पक्ष्याला मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
नाशिक शहराची पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख अधोरेखित करणाऱ्या एका अनोख्या उपक्रमात गिधाडाला पक्षी मानचिन्ह म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली आहे. कावळा की गिधाड, यापैकी नाशिकचे मानचिन्ह कोणता पक्षी असावा, यासाठी नागरिकांमध्ये ऑनलाइन मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.
या अनोख्या पक्षी निवडणुकीत एकूण ३ हजार ३२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी गिधाडाला १ हजार ९९५ मते, तर कावळ्याला १ हजार ३७ मते मिळाली. तब्बल ९५८ मतांच्या फरकाने गिधाडाने कावळ्यावर विजय मिळविला. एकूण मतदानापैकी गिधाडाला सुमारे ६५.८ टक्के, तर कावळ्याला ३४.२ टक्के मते मिळाली. त्यामुळे नाशिकच्या पक्षी मानचिन्हासाठी गिधाडाला नागरिकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.या प्रक्रियेत गिधाडाने आघाडी घेतल्याने नाशिकच्या पक्षी मानचिन्हासाठी त्याची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गिधाडालाच पसंती का? काय आहे नाशिकशी नाते?
गिधाड हा पक्षी केवळ निसर्गातील एक महत्त्वाचा घटक नसून नाशिकच्या ऐतिहासिक आणि पौराणिक वारशाशीही जोडलेला आहे. रामायणातील जटायूची कथा नाशिकच्या परिसराशी संबंधित मानली जाते. रावणाने सीतेचे अपहरण केले असताना जटायूने सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी संघर्ष केला होता. या संघर्षात जटायूने आपल्या प्राणांची आहुती दिली.
नाशिक जिल्ह्यातील टाकेद येथील जटायू मंदिर आणि अंजनेरी परिसरातील गिधाडांचा अधिवास यामुळे या पक्ष्याचे नाशिकशी असलेले नाते अधिक अधोरेखित होते. त्यामुळे गिधाडाची निवड ही नाशिकच्या पौराणिक आणि नैसर्गिक वारशाचे प्रतीक ठरू शकते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यात गिधाडांची महत्त्वाची भूमिका
गिधाडांना निसर्गातील स्वच्छता कर्मचारी असेही म्हटले जाते. मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम गिधाडे करतात. त्यामुळे मृत प्राण्यांच्या अवशेषांमुळे पसरणाऱ्या रोगांचा धोका कमी करण्यास मदत होते.
मात्र, गेल्या काही वर्षांत गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. औषधांचा वापर, अधिवासातील बदल, अन्नाची उपलब्धता आणि मानवी हस्तक्षेप यांसारख्या कारणांमुळे गिधाडांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे गिधाडाला मानचिन्ह म्हणून निवडल्यास या पक्ष्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यास मदत होऊ शकते.
निवड प्रक्रियेवर पर्यावरणप्रेमींचे आक्षेप
दरम्यान, नाशिकचा पक्षी मानचिन्ह निवडण्याच्या उपक्रमाचे स्वागत होत असतानाच निवड प्रक्रियेवर काही पक्षीमित्र आणि पर्यावरण अभ्यासकांनी आक्षेपही नोंदविले होते. नाशिक शहर आणि परिसरात अनेक प्रकारचे पक्षी आढळत असताना केवळ कावळा आणि गिधाड हे दोनच पर्याय का देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
निवड प्रक्रियेत स्थानिक पक्षी अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि विविध संस्थांना अधिक व्यापक स्वरूपात सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच शहराचे प्रतिनिधित्व करणारा पक्षी निवडताना त्याचे पर्यावरणीय महत्त्व, अधिवास आणि जैवविविधतेतील योगदान यांचाही विचार व्हावा, अशी भूमिका मांडण्यात आली होती.
नाशिकच्या पर्यावरणीय ओळखीला नवी दिशा
नाशिक हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत गिधाडाला पक्षी मानचिन्ह म्हणून पसंती मिळणे ही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरू शकते.
गिधाडाची अधिकृत निवड जाहीर झाल्यानंतर या उपक्रमाला नवी ओळख मिळेल. त्याचबरोबर गिधाडांचे संरक्षण, त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवणे आणि पुढील पिढीमध्ये पक्ष्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हीदेखील महत्त्वाची उद्दिष्टे असतील.




