Thursday, November 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAhilyanagar News : जिल्हा बँकेवर 'सहकार विकास आघाडी'चे वर्चस्व; अध्यक्षपदी डॉ. सुजय...

Ahilyanagar News : जिल्हा बँकेवर ‘सहकार विकास आघाडी’चे वर्चस्व; अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे, तर उपाध्यक्षपदी रणजीत देशमुख यांची बिनविरोध निवड

अहिल्यानगर | Ahilyanagar

जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आज (गुरुवार दि. १२) रोजी बिनविरोध पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) तर उपाध्यक्षपदी संगमनेर येथील रणजीत देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली. निवडीनंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत स्वागत केले.

- Advertisement -

सहमती एक्सप्रेसचा फॉर्म्युला यशस्वी

आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत विखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या २१ जागांच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार विकास आघाडी’ने १७ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर अकोले येथील अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनीही या आघाडीला पाठिंबा दिल्याने आघाडीचे संख्याबळ १८ वर पोहोचले. या निवडणुकीत विरोधी सहकार परिवर्तन मंडळाला अवघी १ जागा, तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या होत्या. स्पष्ट बहुमतामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते.

उत्तर भागाचेच वर्चस्व आणि सत्तेचे समीकरण

बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि उत्तर-दक्षिण असा प्रादेशिक समतोल साधला जाणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्षपदी रणजीत देशमुख यांची निवड झाल्याने बँकेची दोन्ही महत्त्वाची पदे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडेच राहिली आहेत. विखे आणि थोरात यांच्या ‘सहमती एक्सप्रेस’मध्ये अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी विखे गटाकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंतिम निर्णयानुसार डॉ. विखेंच्या नावावर शिक्कामोर्तब

निवडणुकीत थोरात गटाचे ११ आणि विखे गटाचे ६ संचालक निवडून आले असले, तरी महायुती आणि भाजप गटाचे एकत्रित संख्याबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अंतिम निर्णयानुसार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा विखे-थोरात-गडाख या नेत्यांची एकजूट पाहायला मिळाली असून, आगामी काळात बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

संजय

Sanjay Raut: मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग खेळ आहे, मोठे-मोठे खेळाडू आहेत; संजय...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ते...