नवी दिल्ली | New Delhi
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दुपारी सुरक्षा दलांच्या गस्ती पथकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्खोरांनी गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) तीन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली आहे.
मीर बाजारजवळ दुपारी २.१५ च्या सुमारास गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजारजवळील नोवपोरा अखरान परिसरात CRPFच्या ४६व्या बटालियनचे जवान सुरक्षा नाक्यावर तैनात होते. बुधवारी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना तत्काळ उपचारासाठी अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परिसराला सुरक्षा दलांचा वेढा; शोधमोहीम सुरू
हल्ल्यानंतर पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दलांचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिसराला वेढा घालण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांचा नेमका उद्देश काय होता आणि या हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, याबाबत तपास यंत्रणांकडून माहिती गोळा केली जात आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.




