बारामती | Baramati
बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरु असताना 2029 च्या निवडणुकीविषयी आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. जय पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, २०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे वक्तव्य केले. यावर आमदार रोहित पवार यांनी २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार, असा सामना होऊ शकतो, असे सांगितलं आहे. ते मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते
बारामती मधून २०२९ ला मी उमेदवार असावे असे बारामतीकरांना वाटतं असून ही लोकांची इच्छा असल्याचे जय अजित पवार यांनी बारामती सांगितले होते. त्यावरून रोहित पवार म्हणाले, कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते, ते ऐकावे लागते. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणुकीला उभं राहणार नसतील तर, जे कोणी उभं राहील, 2029 ला तशी बघितली तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते. बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते.
चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात
अजितदादांच्यावेळी पवार विरुद्ध पवार झालं आहे, लोकसभेलाही पवार विरुद्ध पवार झालेलेच आहे. उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवटची दादांची इच्छा होती, पवार परिवार एकत्र आला पाहिजे. हे कितीही खरं असलं तरी राजकीय दृष्टीकोनातून चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात,काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. उद्या जाऊन परिवाराला एकत्र यायचं झालं तर आम्ही विरोधात आहोत. पण सत्तेतून काही लोकांना पक्षाला बाहेर येणे, आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करता तो तसा सोपा निर्णय नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.
“अजितदादा असताना विलिनीकरण होणार होते. अजितदादा असताना विलिनीकरण झाले असते २०२९ मध्ये ते मुख्यमंत्री झाले असते. पवार कुटुंबात अजितदादा पुढाकार घेणारी व्यक्ती होती. अजितदादा नसतील तर विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
“लोकसभेला झाले तसे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, अशी इच्छा कुटुंबातील व्यक्तींची होती. आता पवार विरुद्ध पवार लढत व्हायला नको पाहिजे, अशी शरद पवारांची इच्छा असेल. पण, शेवटी हा राजकारणाचा भाग आहे, उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही,” असे रोहित पवारांनी म्हटले.
जय पवार काय म्हणाले होते?
दरम्यान लोकांची मागणी आहे की, २०२९ मध्ये बारामतीचा उमेदवार मी व्हावं. लोकांची अपेक्षा आहे की, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं लोकांची ती इच्छा असल्याचे जय पोवार यांनी सांगितले होते.





