अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला आहे. मकोका, एमपीडीए आणि हद्दपारी अशा कठोर कायदेशीर कारवायांच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांसह गुन्हेगारी टोळ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील आठ गुन्हेगारी टोळ्यांमधील तब्बल 77 जणांवर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीएचे 10 प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आले असून त्यापैकी पाच प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पाच सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच आठ टोळ्यांतील 21 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, रस्ता लुट, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यांसोबतच वाळूतस्करी, गोमांसाची अवैध वाहतूक, खंडणी आणि सुपारी घेऊन खून करण्यासारखे गंभीर प्रकारही घडत आहेत. यातील अनेक गुन्हे संघटित टोळ्यांच्या माध्यमातून केले जातात. टोळीप्रमुख दोन किंवा त्यापेक्षा अधिक साथीदारांना एकत्र करून गुन्हेगारी कारवाया करतात. एखाद्या भागात अशा टोळ्यांचा प्रभाव वाढला की सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यासही धजावत नाहीत. त्यामुळे अशा टोळ्यांचा वेळीच बंदोबस्त करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का कायद्याचा वापर केला जातो. एखाद्या टोळीतील सदस्यांकडून सातत्याने संघटित पध्दतीने गुन्हे केले जात असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याकडून मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला जातो. टोळीप्रमुखासह सदस्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि एकत्रितपणे केलेल्या गुन्ह्यांचा तपशील त्यामध्ये समाविष्ट केला जातो. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित टोळीविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील आठ गुन्हेगारी टोळ्यांमधील तब्बल 77 गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी करणार्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. टोळीप्रमुख आणि त्याच्या साथीदारांना एकत्रितपणे कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा हा प्रभावी मार्ग मानला जातो.
सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायद्याचाही वापर केला जात आहे. एखाद्या गुन्हेगाराकडून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले जात असतील आणि त्याच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असेल, तर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला जातो. हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. जिल्हा पोलिसांनी अशा प्रकारचे 10 प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविले होते. त्यापैकी पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार पाच सराईत गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले असून ते सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. उर्वरित पाच प्रस्तावांवर निर्णय होणे अपेक्षित आहे.
एखाद्या परिसरात गुन्हेगारी टोळीची दहशत वाढल्यास त्या टोळीप्रमुखासह सदस्यांना संबंधित कार्यक्षेत्रातून बाहेर काढण्याची कारवाई केली जाते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 नुसार पोलीस अधीक्षकांना गुन्हेगारी टोळ्यांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्याचे अधिकार आहेत. या तरतुदीनुसार जिल्ह्यात गेल्या वर्षभरात आठ गुन्हेगारी टोळ्यांमधील 21 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय आणखी 21 हद्दपारीचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी काही गुन्हेगारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, हद्दपारीची कारवाई झाल्यानंतरही काही गुन्हेगार आपल्या मूळ कार्यक्षेत्रात पुन्हा वावरताना आढळतात. त्यामुळे केवळ हद्दपारीचा आदेश काढून न थांबता त्याच्या अंमलबजावणीवरही पोलिसांना लक्ष ठेवावे लागत आहे.
प्रांतांकडील 147 प्रस्ताव प्रलंबित
गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार एखाद्या स्वतंत्र गुन्हेगाराला हद्दपार करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकार्यांना आहेत. या तरतुदीनुसार जिल्हा पोलिसांनी विविध उपविभागीय अधिकार्यांकडे एकूण 161 हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 14 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तब्बल 147 प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. पोलिसांकडून प्रस्ताव पाठविण्यात आले असले तरी त्यावर निर्णय होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे प्रांत स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर वेळेत निर्णय होणे आवश्यक आहे.
चोरी, घरफोड्यांच्या टोळ्या सक्रिय
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत चोरी, घरफोडी, दरोडा आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे एकाच पध्दतीने वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतील, तर त्यामागे एखादी सक्रिय गुन्हेगारी टोळी असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटनांची कार्यपध्दती तपासून संबंधित टोळ्यांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.




