नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये निधीतून साकारलेल्या बिटको रुग्णालयातील कॉम्पोनंट ब्लड बँकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लाभला आणि महापौर हिमगौरी आहेर-आडके तसेच आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत रक्तपेढी सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून शुभारंभाच्या प्रतीक्षेत असलेली ही रक्तपेढी गोरगरिबांसह सामान्य जनतेसाठी किती उपयुक्त आहे याची जाणीव असतानाही राजशिष्टाचारासारख्या खुळचट कल्पना पुढे आणून महापालिकेने अद्ययावत साधनसामग्रीने युक्त असलेली ही रक्तपेढी सुरूच होऊ दिली नव्हती.
हे असे का, यात कोणी झारीतील शुक्राचार्य होते का, याची तपासणी केली तर नावे पुढे येऊ शकतील. परंतु आता तो चिखल चिवडण्यात तसाही अर्थ नाही. पण किमान तीन वेळा या रक्तपेढीच्या उद्घाटनाची तारीख, वेळ मुक्रर झाली आणि केवळ मंत्र्यांना वेळ नाही म्हणून कार्यक्रमच रद्द केला गेला. या देशात रुग्णांच्या सुविधेपेक्षाही मंत्र्यांच्या वेळेला अधिक महत्त्व असल्याचे अशा घटनांमधून वारंवार दिसते. नाशिकबाबत तर असा जणू प्रघातच पडत चालला आहे. कारण असाच अनुभव सध्या उपनगर या पोलीस स्थानकाच्या नव्या इमारतीबाबतही येत आहे. तेरा वर्षे भाड्याच्या जागेत राहिलेल्या या पोलीस स्थानकासाठी सरकारनेच कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत इमारत साकार केली. गेली सहा महिने सदर इमारत पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
या इमारतीचा शुभारंभ गृहमंत्रीही असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते करण्याचा हट्ट काही मंडळींचा असल्याने स्वत:ची इमारत असूनही पोलीस ठाणे भाड्याच्या अपुर्या जागेतच सुरू आहे. महिनाभरापूर्वी कंटाळून ठाण्याची काही कामे या नव्या इमारतीतून सुरू केली गेली असली तरी प्रत्यक्षात इमारतीचे उद्घाटन झालेले नसल्याने अधिकारी वर्गाला जुन्याच इमारतीतून कारभार चालवावा लागत आहे. ही सरकारी इमारत असल्याने व आमदारांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेली असल्याने त्यासाठी अमूक एक नेत्याच्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट एकवेळ समजू शकतो. परंतु नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील रक्तपेढीसाठी सियुरिटी प्रेसने साडेतीन कोटींहून अधिक रक्कम स्वत:च्या निधीतून खर्ची टाकली आहे.
तेव्हा या उपक्रमासाठी त्यांना सन्मानपूर्वक विचारणा करून पुढील प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित होते. दुर्दैवाने यापूर्वीच्या तीनही वेळी प्रेसच्या अधिकार्यांना उद्घाटनासाठी बोलविले गेले आणि मुख्य पाहुणेच न आल्याने कार्यक्रम रद्द केला गेला. पुढार्यांच्या वेळेची चिंता आहे, पण देशातील चलन जेथे निर्माण होते अशा प्रेसच्या प्रमुख अधिकार्यांच्या वेळेची मात्र अजिबात पर्वा नाही. त्या प्रमुख अधिकार्यांना तंगवत ठेवून वेठीस धरणे कितपत शहाणपणाचे, याचा विचार कधीतरी होणार आहे की नाही? प्रत्यक्षात जेव्हा उद्घाटन झाले तेव्हा या अधिकार्यांनी गैरहजर राहून आपली भावना अत्यंत संयत शब्दात व्यक्त केली हे बरे झाले. पालिका ही या महानगराची पालक संस्था आहे, याचा विसर हल्ली पडत चालल्याचे वारंवार आढळून येते.
ही रक्तपेढी किती महत्त्वाची आहे, याचा एकदा आठव जरी केला असता तरी पालिकेतील समस्त उच्चविद्याविभूषित शहाण्यांनी लागलीच ती सुरू केली असती. करन्सी नोट प्रेसच्या सीएसआर फंडातून उभ्या राहिलेल्या या अद्ययावत व सुसज्ज अशा कॉम्पोनंट ब्लड बँकेमुळे गरीब व गरजू रुग्णांसाठी रक्तघटकांच्या विविध प्रकारच्या अत्यंत महागड्या चाचण्या मोफत वा नि:शुल्क होऊन त्यांना योग्यवेळी झटपट उपचार मिळू शकणार आहेत. नाशिकमध्ये दररोज प्रसूती झालेल्या अंदाजे ८० ते ९० महिलांना रक्ताची तातडीने गरज असते, तसेच नवजात बालकांना रक्त संक्रमण करताना घटकांची कमतरता असल्यास चिंतेची बाब ठरू शकते. गरजेनुसार रक्ताचे घटक वेगळे केले तर रुग्णांना रक्त व त्याचे घटक शय तितया लवकर उपलब्ध करून दिले जाऊ शकतात.
गोरगरिबांच्या जीवनमरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या रक्तपेढीचे उद्घाटन महिनोन्महिने प्रलंबित ठेवणे हा खरे तर गुन्हा आहे. सत्तेच्या धुंदीत आपण काहीही केले तरी काय फरक पडतो, अशा आविर्भावात सध्या भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते वर्तन करीत असल्यानेच अशा सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्याची नोकरशाहीचीही हिंमत होते. उपनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पूर्णत्वाच्या बाळंतकळा तर भलत्याच तापदायक होत्या. तरीही त्याला पुरून उरत काही नेते, कार्यकर्त्यांनी इमारत पूर्णत्वास नेली.
आता याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्यांना नव्या, चांगल्या सर्व सुविधायुक्त अशा इमारतीचा वापर करण्यासाठीचा दिलासा देणे गरजेचे आहे. परंतु आले नेत्यांच्या मना, तेथे कोणाचे चालेना, असा सारा कारभार आहे. नाशिकरोडची रक्तपेढी गिरीश महाजन यांना, तर उपनगरची इमारत मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे शुभारंभाच्या प्रतीक्षेत होती. हे दोघेही आदरणीय नेते मधल्या काळात अनेकदा नाशिकला येऊन गेले; पण तरीही त्यांना या सार्वजनिक सुविधेसाठी वेळ मिळाला नव्हता. यावर आता काय बोलावे अन् किती लिहावे? कार्यक्षम कारभाराचे आदर्श उदाहरण याउपर कोणते असू शकेल, नाही का..




