नाशिक | प्रतिनिधी Nashik
कुंभमेळ्यासाठी कुणाचाही विरोध नाही मात्र कामांचे ठेके कुठल्या राज्यातील कंपन्यांना दिले, त्यातून नाशिकला काय फायदा झाला आणि पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते नागरिकांसाठी धोकादायक ठरणार नाहीत याची सरकार हमी देऊ शकते का, असा सवाल करत शिवसेना (उबाठा) पक्ष नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी कुंभमेळा विकासकामांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुंभमेळ्यासाठी कुणाचाही विरोध नाही. पण या निमित्ताने होणाऱ्या कामांचे ठेके कुठल्या राज्यातील ठेकेदारांना दिले गेले आणि त्याचा स्थानिक नागरिक व उद्योगांना नेमका काय फायदा झाला? असा सवाल त्यांनी केला. नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले असून पावसाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सरकार नागरिकांना खात्री देऊ शकते का की पावसाळ्यात या रस्त्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी किंवा गैरसोयी होणार नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले कि, गेल्या १२ वर्षांत सरकारने आखलेली आर्थिक रणनीती अपयशी ठरली असून त्याचे परिणाम आता जनतेला भोगावे लागत आहेत. अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना कामांचे पैसे मिळाले नाहीत. काही मोजक्या ‘लाडक्या’ ठेकेदारांनाच पैसे दिले जात आहे. अशा परिस्थितीत एखादा ठेकेदार काम अर्धवट सोडून गेला तर सरकार जबाबदारी घेणार का? असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील उद्योगधंद्यांची स्थितीही गंभीर असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारच्या धोरणांमुळे छोटे-मोठे उद्योग बंद पडत आहेत. सरकारने राजकारणातून बाहेर पडून राज्यातील खरी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. अन्यथा जनता त्यांना पळवून लावेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या नाशकात सुरु असलेल्या भूमिअधिग्रहण विषयी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले की, शेतकरी कुठल्याही विकासकामाला विरोध करत नाही; मात्र त्यांच्याशी संवाद साधला जात नाही. मुख्यमंत्री राज्याला सिंगापूरच्या पुढे नेण्याची भाषा करतात; पण सामान्य माणूस दुचाकीवर जाईल की सायकलवर, अशी अवस्था निर्माण झाली आहे. एका बाजूला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला जनतेची बिकट परिस्थिती दिसते, असा टोला त्यांनी लगावला.
इंधनटंचाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार म्हणते पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे; पण मुंबईहून नाशिककडे येताना अनेक पेट्रोल पंप बंद दिसले. मग हा साठा नेमका कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागत असून अनेक ठिकाणी वाद आणि मारामाऱ्या होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
सोशल मीडियावरील निर्बंधांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी “कॉकरेज जनता पार्टी” या सोशल मीडिया पेजचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. सरकारला सोशल मीडिया पेजचीही भीती वाटते. भीती सरकारमध्ये आणि आक्रोश जनतेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पाकिस्तानबाबतच्या चर्चांवर, बीसीसीआयच्या भूमिकेवर तसेच रुपयाच्या घसरणीवरही भाष्य केले. आशियातील सर्वात कमकुवत चलन म्हणून भारतीय रुपयाची अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानच्या चलनाच्या तुलनेतही रुपया घसरला आहे. याला केवळ युद्ध कारणीभूत नसून सरकारची आर्थिक धोरणे जबाबदार आहेत,असा आरोप त्यांनी केला.
नागरसेवकांसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शिवसेना उबाठा पक्षाचे १५ नगरसेवक शहरातील जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत आहेत. विरोधी पक्ष म्हणून शहरातील अनेक विषयांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जनतेमध्ये सुरू असलेली कुजबुज आणि नाराजी कोणत्या पद्धतीने पुढे आणायची यावर आमच्यात चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




