भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 3608 दलघफू झाला होता. वाढलेला पाऊस आणि होणारी आवक लक्षात घेता धरणातील पाणीसाठा आज 4000 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे.
भंडारदर्यात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 265 दलघफू पाण्याची आवक झाली. काल दिवसभरात 109 दलघफू पाणी दाखल झाले. दुपारनंतर पाणलोटात पावसाचा जोर आणखी वाढल्याने आज पाण्याची चांगली आवक होण्याची शक्यता आहे. तसेच 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलावातील पाणीसाठा 57.18 दलघफू (51टक्के) झाला आहे. निळवंडेत अजून म्हणावी तशी आवक होत नसल्याने साठा फारसा वाढलेला नाही काल सकाळपर्यंत केवळ 11 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. पाणीसाठा 1583 दलघफू होता. आढळात 361 दलघफू पाणी आहे.
जून संपला तरी पाऊस नसल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण गत सहा दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय असल्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरण परिसरातील सौंदर्य अधिक बहरू लागले आहे. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. पावसाचा जोर वाढल्याने डोंगरदर्यात राहणारा आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. तसेच जनावरेही गारठू लागले आहेत. सर्व परिसर धुक्याने गारठून गेला असून जनजीवन गारठले आहे.
मुळा पाणलोटातही पावसाची संततधार
कोतूळ |वार्ताहर| Kotul
अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात काल दुपारपासून पावसाचा वेग वाढल्याने मुळा धरणाकडे पाणी झेपावत आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर असल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 2635 क्युसेक होता. रविवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने सायंकाळी हा विसर्ग 2053 पर्यंत खाली आला.
पण त्यानंतर दुपारनंतर पावसाचा वेग पुन्हा काहीसा वाढल्याने मुळा नदीतील विसर्ग हळू हळू वाढत होता. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 6356 दलघफू (24.44टक्के) होता. धरणात पाण्याची आवक होणार असल्याने आज या धरणातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे ओढेनाले खळखळू लागले असून शेतांमध्ये पाण्याचे तळे साचू लागले आहे. पाऊस कोसळत असल्याने भात लावणीच्या कामाला वेग येणार आहे.
कुकडीत 407 दलघफू नवीन पाण्याची आवक
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि औद्यागिकरणाचे भवितव्य अवलंबून असलेल्या कुकडी समूह धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने सर्वच धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 407 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.त्यामुळे समूह धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 3050 दलघफू (11टक्के) झाला आहे.
गत आठवडाभरात या प्रकल्पात एकूण 1683 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. गतवर्षी हा पाणीसाठा 11122 दलघफू (37 टक्के) होता. कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंभेत 225 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी अशी- येडगाव 26.21 टक्के, माणिकोह 8.72 टक्के, वडज 26.10 टक्के, डिंभे 10.76 टक्के, विसापूर 13.6 टक्के, चिल्हेवाडी 22.52 टक्के, पिंपळगाव जोगे आणि घोडेगाव धरणात नवीन पाणी येत असलेतरी या धरणांतील पाणीसाठा मायनस आहे.
भावलीत धो-धो पाऊस; 12 तासांत तब्बल साडेपाच इंच पावसाची नोंद
दारणाच्या पाणलोटात मध्यम तर गंगापूरच्या पाणलोटात बुरबुर
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
दारणा धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता तर गंगापूर धरणाच्या पाणलोटात बुरबुर सुरू होती. भावलीला काल दिवसभरात 12 तासांत 135 मिमी पावसाची नोंद झाली. मध्यम आणि बुरबुर स्वरूपाच्या पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात नगण्य वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटातील घाटमाथा अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. भावली, भाम परिसरात पडणार्या पावसात जोर आहे. घोटी, इगतपुरीला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत आहे.
काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत इगतपुरी येथे 87, घोटी येथे 41 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 26 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे 38, वाकी 47, भाम 30, भावली 37, वालदेवी 36, कडवा 17, आळंदी 27 मिमी असा पाऊस नोंदला गेला. धरणांच्या पाणी साठ्यात नगण्य वाढ झाली. दारणा धरणात काल सकाळपर्यंत मागील 24 तासांत अवघे 1 दलघफू (1 जून पासून एकूण 4 दलघफू), मुकणे 55 दलघफू (62 दलघफू), वाकी 28 दलघफू (33 दलघफू), भाम 47 दलघफू (72 दलघफू ), भावली 44 दलघफू (134 दलघफू), वालदेवी 17 दलघफू (23 दलघफू) अशी नवीन पाण्याची आवक झाली. भावली 25 टक्क्यांच्या पुढे सरकले आहे.
सकाळपर्यंत 30 टक्क्यांपर्यंत हा प्रकल्प भरला असेल. काल दिवसभरात भावलीला 12 तासांत 235 मिमी पावसाची नोंद झाली. भाम ला 29 मिमी, तर दारणाच्या भिंतीजवळ 6 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोटात बुरबुर स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत होते. काल दिवसभरात कश्यपीला 7 दलघफू, गौतमीला 8 दलघफू तर गंगापूरमध्ये 9 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत 12 तासात गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 5 मिमी, कश्यपी ला 3 मिमी, गौतमीला 6 मिमी, त्र्यंबकला 2 मिमी, आंबोलीला 3 मिमी पावसाची नोंद झाली. काल सायंकाळी पावसात काहीसा जोर दिसला.




