Wednesday, November 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : एका न झालेल्या राजीनाम्याची चित्तरकथा!

पडसाद : एका न झालेल्या राजीनाम्याची चित्तरकथा!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या कथित राजीनाम्याची गेल्या आठवड्यात माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. केदार यांची हकालपट्टी झाल्याची आनंदवार्ताही काही हितचिंतकांनी देऊन टाकली. स्वीकृत नगरसेवकांच्या यादीप्रकरणी त्यांच्यावर पक्षाने कारवाई केल्याचे एकीकडे सांगितले गेले तर केदार यांनी स्वत:हून राजीनामा दिला, असेही काहींचे म्हणणे होते. दस्तुरखुद्द केदार यांनी मौन स्वीकारून त्यातील गूढ वाढविले होते. अनेकांशी बोलताना त्यांनी, नो कॉमेंट्स अशीच प्रतिक्रिया दिली.

परंतु त्याव्यतिरिक्त पालकमंत्री गिरीश महाजन किंवा पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या कोणीही या राजीनामा वृत्ताचा आजपर्यंत ना इन्कार केला ना दुजोरा दिला! दोन दिवस राजकीय वर्तुळात खळबळ माजल्यानंतर केदार यांनी कार्यालयातच काम करीत असल्याचे सोशल मीडियाद्वारे दाखवून अप्रत्यक्षरित्या आपण पदावर आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आजही, हे लिहित असेपर्यंत केदारांच्या त्या कथित राजीनाम्याचे काय झाले हे कोणीही सांगायला तयार नाही. मात्र, ज्याअर्थी धूर निघाला त्याअर्थी कुठेतरी नक्कीच आग लागलेली असावी.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये कमालीचा संघर्ष होता. सहा जागांसाठी किमान तीनशे ते कमाल पाचशे इच्छुक होते. त्यामुळेच पक्षाने ही निवड प्रक्रियाच लांबविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाचा दट्ट्या आल्याने अखेरीस प्रक्रिया राबवावी लागली. जी नावे ऐनवेळी पक्षाने जाहीर केली, त्यावरून अजूनही रुसवे-फुगवे होत असले तरी ही निवड प्रक्रिया सुरू असतानाच केदारांच्या राजीनाम्याची बातमी फुटल्याने तेच केंद्रस्थानी आले. यातील खरेपणाची खातरजमा न करताच केदारांच्या कराभाराची चिरफाड सुरू झाली. व्यक्तिपरत्वे या चिरफाडीला धुमारे फुटले. गंमत म्हणजे यासंदर्भात भाजपमधील कोणीही चकार शब्द बोलायला तयार नव्हते. त्यामुळे राजीनाम्याची खात्री होत नव्हती.

स्वीकृत नगरसेवकांची यादी न दाखविताच जाहीर केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांना राजीनामा द्यायला लावला, असे खात्रीशीर सूत्र सांगायला लागले. त्यातून काही कड्या उलगडायला लागल्या. केदार यांची एवढीही हिंमत नाही की, अशा महत्त्वाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित निर्णय ते घेऊन परस्पर जाहीरही करतील. विशेष म्हणजे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत असे करणे, केदारांनाच काय तर आमदारांनाही शक्य नाही. याचाच अर्थ महाजन यांच्या अधिकार क्षेत्रातच काहीतरी गडबड झालेली दिसते.

ज्याअर्थी प्रदेशाध्यक्ष संतप्त आहेत, त्यांनी केदारांचा राजीनामा मागितला, असे खात्रीलायक सूत्र सांगत आहेत, याचाच अर्थ खरी आग तर तेथेच लागलेली असावी. महाजन यांना बोल लावता येत नसल्याने केदारांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांनी अधिकार क्षेत्रातील काही अतिक्रमणांना चाप लावला असेल का, असा प्रश्न येथे निर्माण होतो. ज्याअर्थी गिरीश महाजन हे केवळ नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमुखी नेते आहेत, त्याअर्थी केदारांसारख्या लहान कार्यकर्त्याला अशी यादी तयार करणे व ती परस्पर जाहीर करणे शक्य तरी आहे का, याचा अदमास खरेतर सर्वांनाच यायला हवा होता. परंतु केदार यांच्या सही नसलेल्या राजीनाम्याची ठरवून वाच्यता केली गेली असेल का, असाही प्रश्न त्यातून आता पुढे आला आहे.

केदार यांनी राजीनामा दिला असेल किंवा त्यांच्याकडून तो घेतला गेला असेल तर आज एवढे दिवस होऊनही पक्षाने त्याबाबत काहीही अधिकृत सांगितलेले नाही. केदार हे शहराध्यक्ष या नात्याने आपले नियमित दैनंदिन काम करतांना दिसत आहेत. त्यांनी शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही निर्णय घेतले, ते काहींना आवडले नाही. कार्यालयात येणार्‍या प्रत्येकाची त्याच्या बूथ क्रमांकासह नोंद ठेवण्याची सक्ती अनेकांना आक्षेपार्ह वाटली.

पालिका निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या वक्तव्यांनी पक्षाची अडचण केली होती. नाशिकरोड भागात तर कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडूनच ठेवले होते. शिवाय तेव्हा आणि आतादेखील स्वीकृतसाठी केदार हे सपत्नीक इच्छुक असल्याचाही दावा केला गेला. केदारांना हाच उतावीळपणा भोवला, असे छातीठोकपणे सांगितले गेले. परंतु या सगळ्या अफवा, आक्षेप सध्या तरी चुकीच्या ठरल्या आहेत. असे जर असेल तर मग ज्या कमालीची शांतता आणि मौन या प्रकरणात पक्षातंर्गत पातळीवर पाळले जात आहे, याचा अर्थ प्रत्यक्षात हा विषय कमालीचा गंभीर असावा.

केदार हे कदाचित मोहरे असावेत. त्यांच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्षांनी आपल्या अधिकारांची जाणीव महाजनांसह काही नेत्यांना करून दिलेली असावी का, असा प्रश्न यातून पुढे येतो. म्हणजे, प्रदेश संघटना व मंत्री यांच्यात एकवाक्यता नसावी, त्यामुळेच अधिकारातिक्रमणाचा विषय ऐरणीवर आलेला असावा. काही समस्यांची उकल ही अशी परस्पर काढली जाण्याची राजकारणात पद्धत असते. जाहीररित्या संबंधिताला दुखवायचे तर नाही, पण त्याला जाणवेल असे लक्षणीय काम करायचे, अशी ही सर्जनशीलता अनुभवी नेत्यांच्या ठायी असते. केदार हे भाजपचे जुने कार्यकर्ते असल्याने त्यांचा मोहरा म्हणून वापर करणे कदाचित पक्षालाही सोपे गेलेले दिसते. आता तर कसला राजीनामा, असेदेखील विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ नोव्हेंबर २०२६ – नंदनवनात शांततेची चाहूल

0
साडेतीन दशकांहून अधिक काळ दहशतवाद, रक्तरंजित हिंसाचार आणि अस्थिरतेच्या सावटाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये शांततेची आशा निर्माण होत आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील देवसर परिसरातील जंगलपोरा...