साडेतीन दशकांहून अधिक काळ दहशतवाद, रक्तरंजित हिंसाचार आणि अस्थिरतेच्या सावटाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये शांततेची आशा निर्माण होत आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील देवसर परिसरातील जंगलपोरा (झंगलपोरा) गावात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक दहशतवादी मोहम्मद लतीफ भट मारला गेला. त्यानंतर काश्मीर खोर्यात पोलिसांच्या नोंदीनुसार एकही सक्रिय स्थानिक दहशतवादी शिल्लक नसल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. सीआरपीएफ जवानांवरील ११ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर अवघ्या आठवडाभरात झालेली ही कारवाई सुरक्षा दलांच्या समन्वयाचे आणि सतर्कतेचे निदर्शक आहे.
मात्र, या यशाकडे दहशतवादावरील अंतिम विजय म्हणून न पाहता शांततेच्या दिशेने पडलेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणूनच पाहिले पाहिजे. या यशामागे सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांमधील वाढता समन्वय महत्त्वाचा ठरला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विविध गुप्तचर यंत्रणा यांच्यात माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावी झाली आहे. अचूक गुप्त माहिती, संयुक्त मोहिमा आणि तातडीने राबविण्यात येणार्या शोधमोहिमांमुळे दहशतवाद्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, देखरेख प्रणाली आणि सीमावर्ती भागातील सततची गस्त यांमुळे सुरक्षा व्यवस्थेला बळ मिळाले आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांना आश्रय, रसद किंवा अन्य मदत पुरविणार्या जाळ्यांवर कारवाई केल्याने त्यांच्या हालचालींना मर्यादा आल्या आहेत.
दहशतवादाचा मुकाबला केवळ चकमकींमधून नव्हे, तर त्याला मिळणारे स्थानिक पाठबळ कमकुवत करूनच करता येतो, हे सुरक्षा यंत्रणांनी ओळखले आहे. नियंत्रण रेषेवरील घुसखोरी रोखण्यात मिळालेले यशही आश्वासक आहे. संरक्षण मंत्रालयाच्या २०२५-२६ च्या वार्षिक अहवालानुसार, २०२१ मध्ये घुसखोरीचे आठ प्रयत्न उधळण्यात आले आणि १२ दहशतवादी मारले गेले. २०२२ मध्ये १२ प्रयत्नांत १८, तर २०२३ मध्ये १८ प्रयत्नांत ३६ दहशतवादी मारले गेले. २०२४ मध्ये दहा प्रयत्न उधळताना १९, तर २०२५ मध्ये सहा प्रयत्नांत १२ दहशतवादी मारण्यात आले. या आकडेवारीतून नियंत्रण रेषेवरील सतर्कता दिसून येते. मात्र, घुसखोरीचे प्रयत्न कमी झाले म्हणजे सीमापार दहशतवादाचा धोका संपला, असे मानणे चुकीचे ठरेल.
अहवालात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागातून घुसखोरीबरोबरच अमली पदार्थ आणि घातक साहित्याच्या तस्करीचे आव्हानही अधोरेखित करण्यात आले आहे. काश्मीरमधील बदलाचा सर्वांत आशादायक पैलू म्हणजे स्थानिक तरुणांची दहशतवादी संघटनांकडे घटलेली ओढ. संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणार्या स्थानिक तरुणांची संख्या २०२१ मधील १४६ वरून २०२२ मध्ये १२१, २०२३ मध्ये १९, २०२४ मध्ये चार आणि २०२५ मध्ये केवळ एक झाली. ही घसरण दिलासादायक आहे. मात्र, या आकडेवारीचे रूपांतर कायमस्वरूपी सामाजिक परिवर्तनात होणे गरजेचे आहे. तरुणांना शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, उद्योग आणि व्यवसायाच्या पुरेशा संधी मिळाल्या, तरच हिंसाचाराच्या विचारसरणीला प्रभावी पर्याय उभा राहील. युवकांच्या आकांक्षांना दिशा देणे ही सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे.
तथापि, स्थानिक दहशतवाद्यांची संख्या शून्यावर आल्याचा दावा म्हणजे काश्मीरमधील दहशतवादाचा पूर्ण अंत नव्हे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, खोर्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांची उपस्थिती अद्याप आहे. सीमापार घुसखोरी, स्थानिक मदतनीसांचे जाळे आणि बदलते दहशतवादी डावपेच ही आव्हाने कायम आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा सक्षम ठेवणे, सीमावर्ती भागातील सुरक्षा मजबूत करणे आणि दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक व स्थानिक मदत रोखणे यांना सातत्याने प्राधान्य द्यावे लागेल. त्याचवेळी सामान्य नागरिकांशी संवाद, प्रशासनातील पारदर्शकता आणि कायद्याच्या राज्याविषयी विश्वास निर्माण करणेही आवश्यक आहे. सुरक्षा कारवायांमध्ये निरपराध नागरिकांचे हक्क आणि प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. एकूणच, सुरक्षा दलांचे धैर्य, आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील दहशतवादी भरतीत झालेली घट यांमुळे काश्मीरमध्ये आशादायक वातावरण निर्माण होत आहे.
साडेतीन दशकांच्या संघर्षानंतर मिळालेली ही संधी टिकवणे हेच खरे आव्हान आहे. त्यासाठी केवळ बंदुकीचा पहारा पुरेसा ठरणार नाही; विकास, रोजगार, सामाजिक सलोखा आणि लोकसहभाग यांचीही जोड द्यावी लागेल. काश्मीरला पुन्हा नंदनवनाचे रूप प्राप्त करून द्यायचे असेल, तर सुरक्षा आणि विकास या दोन्ही आघाड्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. कारण शांतता म्हणजे केवळ बंदुका शांत होणे नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची, सन्मानाची आणि उज्ज्वल भविष्याची खात्री निर्माण होणे होय.




