Wednesday, November 25, 2026
HomeनगरAhilyanagar : 4 हजार शेतकर्‍यांनी घेतले 22 कोटीचे विमा संरक्षण कवच

Ahilyanagar : 4 हजार शेतकर्‍यांनी घेतले 22 कोटीचे विमा संरक्षण कवच

यंदा रब्बी पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. आता नोव्हेंबर महिन्यांचा शेवटचा टप्पा सुरू असून आत्तापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 4 हजरी 261 शेतकर्‍यांनी रब्बी हंगाम पिक विमा योजनेत 8 हजार 252 अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जाद्वारे शेतकर्‍यांनी 21 कोटी 60 लाख 58 हजार रुपयांचे विमा कवच घेतलेल्या असून ज्वारी पिकासाठी नोव्हेंबरअखेर तर गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबरअखेर विमा उतरवता येणार आहे. दरम्यान, दुष्काळामुळे पेरण्या घटल्या असून यामुळे रब्बी हंगामातील पिक विमा देखील घटल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

यंदा पाऊस नसल्याने खरीप हंगामातील जवळपास 80 ते 90 टक्के पिके वाया गेलेली आहे. यामुळे यंदाच्या खरीपाला आता पिक विमा हा एकमेव आधार ठरणार आहे. यंदाचा पिक विमा हा प्रमुख्याने पिक कापणी प्रयोगावर मंजूर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्या खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन हे 50 ते 90 टक्क्यांपर्यंत घटल्याचे पिक कापणी प्रयोगात समोर आले आहे. जिल्ह्यातील पिक कापणी प्रयोगाचा निष्कर्ष आणि अहवाल पिक विमा कंपन्यांना सादर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात मूग, उडीद, सोयाबीन आणि बाजरी या पिकांची पिक विमा मंजूर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

दुसरीकडे दुष्काळ आणि सिंचनाची सोय नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडल्या असून आत्तापर्यंत सरासरीच्या अवघ्या 25 टक्केच पेरण्या झालेले आहेत. आता पेरणी झालेल्या क्षेत्रात फारशी वाढ होणार नसल्याचे सांगण्यात येत असून ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती, अशा शेतकर्‍यांनी गहू, हरभरा, मका आणि कांदा यासह काही प्रमाणात चारा पिके यांची लागवड केलेली आहे. यातील 4 हजार 261 शेतकर्‍यांनी 8 हजार 252 अर्जाद्वारे रब्बी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे. या पीक विमा योजनेत 4 हजार 889 हेक्टरमधील पिकांना 21 कोटी 60 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

रब्बी पिक विमा योजनेत बागायती गव्हाला हेक्टरी 45 हजार, बागायती ज्वारीला आणि हरभरा पिकाला प्रत्येकी हेक्टरी 36 हजार, उन्हाळी भुईमूग पिकाला 40 हजार 600 रुपये आणि रब्बी कांदा पिकाला 95 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना गव्हासाठी 900, बागायत ज्वारीसाठी आणि जिरायत ज्वारीसाठी 720, हरभरा पिकासाठी 720 आणि उन्हाळी भुईमुगासाठी 812 रुपये आणि रब्बी कांदा पिकासाठी 1 हजार 425 रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.

कांदा पिकाच्या बोगस विम्याकडे राहणार लक्ष
गेल्या वर्षात कांदा लागवड न करता अथवा कमी क्षेत्र लागवड करून अधिक क्षेत्र दाखवून कांदा पिकाचा विमा लाटल्याच्या घटना नगरसह पुणे, नाशिक व अन्य जिल्ह्यात घडलेल्या आहेत. हा प्रकार उघड झाल्यापासून कृषी विभागासह पिक विमा कंपन्यांनी विशेष करून कांदा लागवड आणि पिका विमा यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. यंदा देखील कृषी विभाग डोळ्यात तेल घालून बोगस कांदा पिक विमा यावर लक्ष ठेवणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : बेलापूर येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत...