अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांना अद्याप पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील 90 टक्क्यांहून अधिक भौतिक प्रगती झालेल्या तब्बल 157 पाणी पुरवठा योजना अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. या योजनांची उर्वरित कामे पुढील दीड महिन्यात पूर्ण करून घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपविभागांचे उपअभियंता, शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. जलजीवन मिशनच्या प्रगतीसह आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील 157 योजनांची भौतिक प्रगती 90 टक्क्यांपेक्षा अधिक झाली असतानाही त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित कामे नेमकी कशामुळे रखडली, याचा योजनानिहाय आढावा घेण्यात आला. संबंधित कंत्राटदारांकडून ही कामे येत्या एक ते दीड महिन्यात पूर्ण करून घेण्याचे आदेश भंडारी यांनी दिले. केवळ कामाची टक्केवारी वाढवून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष योजना कार्यान्वित होऊन गावांना पाणी मिळणे महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने कामांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रित केले आहे.
कंत्राटदारांवरील कारवाईचे प्रस्ताव मागविले
जलजीवन मिशनच्या कामांमध्ये दिरंगाई करणार्या कंत्राटदारांबाबत प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. तालुकानिहाय कंत्राटदार, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या उपस्थितीत यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीतील निर्देशांचा संदर्भ देत, संबंधित कंत्राटदारांवर करावयाच्या कारवाईचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कामे रखडविणार्या कंत्राटदारांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
उपाययोजनांसाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा
दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व प्रस्तावित उपाययोजनांची परिपूर्ण अंदाजपत्रके दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले. ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे 157 योजना पूर्ण करण्यासाठी दीड महिन्याची मुदत, तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या उपाययोजनांबाबत तात्काळ उपाययोजना अशी दुहेरी जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर सोपविण्यात आली आहे.




