नाशिक l प्रतिनिधी Nashik
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, संत-महंतांशी संवाद, आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधावाटप, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा आणि शहरातील महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
त्र्यंबकेश्वर दर्शनाने दौऱ्याची सुरुवात
उपमुख्यमंत्री शिंदे सकाळी ९.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर श्री चंद्र लॉन्स येथे संत-महंतांशी संवाद साधणार आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधावाटप
हरसूल येथील महानुभाव दत्त मंदिर, दलपतपूर रोड येथे दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या वतीने आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिधावाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमातून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत केली जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा
दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळी परिस्थिती आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक होणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या नियोजनासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
समांतर गंगापूर रोडचे भूमिपूजन
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या समांतर गंगापूर रोडच्या कामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता होणार आहे. कॅनॉल रोड परिसरातील तिरुमला हाइट्स, पाइपलाइन रोड, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या रस्त्यामुळे गंगापूर रोड परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन
सायंकाळी ४ वाजता गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये कर्मवीर अॅड. बाबुराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन होणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्यात पायाभूत सुविधांचा विकास, सिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्वतयारी, दुष्काळग्रस्तांना मदत आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.
या दौऱ्यात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.




