मुंबई | Mumbai
कॉंग्रेस खासदार आणि नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या ‘बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेत त्यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. यावेळी शिंदेसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून एक मोठी चूक घडली.
सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडण्याच्या नादात त्यांच्याकडून थेट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो असलेला भागही फाडला गेला. मात्र, त्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तो फोटो खाली ठेवला. परंतु, या फोटोचा अर्धा भाग शायना एनसी यांच्याकडून फाडला गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
सोनिया गांधी यांचे ‘बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे नवीन पुस्तक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून, त्यात त्यांनी अनेक जुने किस्से आणि फोटो शेअर केले आहेत. मात्र, या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर तीव्र आक्षेप घेतला. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी आणि शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाच्या प्रती फाडत आपला संताप व्यक्त केला.
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने ठाकरे गट आक्रमक
पुस्तकाच्या प्रती फाडत असताना तेथे ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला भागही नकळत फाडला गेला. इतर फोटो फाडण्याच्या नादात ही चूक झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) इतर नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनी शिंदेसेना आणि शायना एनसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांच्या प्रतिमेचा असा अवमान झाल्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यावर भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




