नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात भारताच्या अर्थव्यवस्थेवरून केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. देशात बेरोजगारीची गंभीर समस्या असून शिक्षण व्यवस्था आणि उत्पादन क्षेत्राची स्थिती चिंताजनक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधी यांना ‘भारताचे मीर जाफर’ संबोधत परदेशात जाऊन देशाची बदनामी करणे हाच त्यांचा पॅटर्न असल्याचा आरोप केला.
‘प्रत्येक भारतीयाला लाज वाटावी अशी विधाने’
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यातील वक्तव्यांवरून त्यांच्यावर निशाणा साधला. परदेशातील भूमीवर जाऊन भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेली विधाने निराधार, खोटी आणि देशहिताच्या विरोधात असल्याचे भाटिया म्हणाले. अशा वक्तव्यांमुळे प्रत्येक भारतीयाला लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने अर्थव्यवस्था, लोकशाही, युवकांचे सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावरील स्थान या क्षेत्रांत प्रगती केल्याचा दावा भाजपने केला.
राहुल गांधी ‘भारताचे मीर जाफर’
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना गौरव भाटिया यांनी त्यांची तुलना मीर जाफर याच्याशी केली. राहुल गांधी हे भारताचे ‘मीर जाफर’ असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मीर जाफर हा बंगालच्या नवाब सिराजुद्दौलाचा सेनापती होता. प्लासीच्या युद्धादरम्यान त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला साथ दिल्यामुळे भारतीय इतिहासात त्याचे नाव विश्वासघाताशी जोडले जाते. याच ऐतिहासिक संदर्भाचा वापर करत भाटिया यांनी राहुल गांधी यांच्यावर राजकीय हल्ला चढवला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत परदेशात नकारात्मक चित्र उभे करणे आणि भारताच्या प्रगतीवर प्रश्न उपस्थित करणे हा राहुल गांधी यांच्या राजकारणाचा भाग असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला.
Nashik News: भूसंपादनाचा मनपाला ४ कोटींचा भुर्दंड; नेमकं प्रकरण काय?
भाटिया म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने लोकशाही, अर्थव्यवस्था, युवा सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर नवीन उंची गाठली आहे. तर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही ‘एक्स’वर पोस्ट करून राहुल गांधींना ‘भारतविरोधी नेते’ म्हणत निशाणा साधला होता. राहुल यांनी विद्यापीठात भारताची अर्थव्यवस्था आपत्तीग्रस्त असल्याचं सांगत आणि लोकशाहीविषयी चिंता व्यक्त करत देशाचा अपमान केल्याचा आरोप भंडारी यांनी केला होता.
राहुल गांधी काय म्हणाले?
विरोधीपक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. १७ नोव्हेंबर रोजी ते न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात गेले होते. तिथे राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि शिक्षणतज्ञांशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी भारतातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि ढासळणाऱ्या आर्थिक परिस्थितीवर कठोर शब्दांत भाष्य केलं.कार्यक्रमात सूत्रसंचालक लिडिया पोलग्रीन यांनी त्यांना भारतीय तरुणांमधील वाढत्या निराशा आणि असंतोषाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, आज देशातील तरुणांना स्वतःचं भविष्य अंधारात दिसत आहे. त्यांना उज्ज्वल भविष्याची कोणतीही खात्री वाटत नाही. भारत सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाच्या दिशेने जात आहे आणि बेरोजगारी खूप वाढली आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोरही अनेक मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत, असं सांगत त्यांनी या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.




