Wednesday, November 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून सावकारीचा धंदा; सराफा व्यावसायिकावर...

Nashik Crime News : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून सावकारीचा धंदा; सराफा व्यावसायिकावर गुन्हा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

सोन्या-चांदीचे दागिने (Gold and Silver) गहाण ठेवून रोख रक्कम देणे आणि त्यावर व्याज आकारून अवैध सावकारीचा व्यवसाय केल्याप्रकरणी पंचवटीतील सराफा व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमानवाडी, मखमलाबाद रोड येथील सर्वेश ज्वेलर्सचा मालक नितीन सुरेश दुसाणे याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

सहकार विभागातील (Cooperation Department) मुख्य लिपिक मंगेश मधुकर वैष्णव यांनी याप्रकरणी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. अक्षय गोपाळ शेरताटे यांनी दुसाणे याच्याविरोधात अवैध सावकारी व्यवसायाची तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडून चौकशी करून कारवाईची प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यानुसार २२ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सहकार विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात सर्वेश ज्वेलर्स या दुकानावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईत अवैध सावकारीशी संबंधित कागदपत्रे आणि व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आले. यामध्ये न्यू श्रीनिवास फायनान्स प्रा. लि.च्या अनेक मूळ पावत्या, विविध व्यक्तींच्या हस्तलिखित चिठ्ठ्या तसेच १३ कर्जव्यवहारांची माहिती असलेला तक्ता आढळून आला.

दुसाणे हा दुकानात (Shop) नागरिकांना रोख रक्कम उसनी देत असे. त्याबदल्यात संबंधितांकडून सोन्या-चांदीच्या वस्तू गहाण ठेवल्या जात होत्या. त्यानंतर या वस्तू न्यू श्रीनिवास फायनान्स प्रा. लि.मध्ये स्वतःच्या नावावर ठेवून त्याआधारे कर्जरूपाने रक्कम मिळवली जात असल्याचे तपासात समोर आले. गहाण वस्तू ठेवणाऱ्या व्यक्तींना त्याबदल्यात रक्कम देऊन त्यांच्याकडून व्याजही स्वीकारले जात असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न झाल्याचा दावा सहकार विभागाने केला आहे.

जप्त कागदपत्रांची पडताळणी आणि संबंधित व्यावसायिकाला सुनावणीची संधी दिल्यानंतर त्याच्याकडून अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यानंतर सहकार विभागाने शासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्याला प्राधिकृत केले. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील कलम २३, ३९, ४२ आणि ४५ अन्वये पुढील कारवाई सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दुचाकींच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

0
सातपूर | प्रतिनिधी | Satpur सातपूर (Satpur) औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनीजवळ मंगळवारी (दि. १७) सकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या...