नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
नाशिक जिल्ह्यातील ज्या काही समाजमान्य शिक्षणसंस्था आहेत, त्यामध्ये क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेप्रमाणेच समाजाचा सर्वांगिण आधार असलेली संस्था म्हणून या संस्थेचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. जिल्हाभरात मराठा समाजाबरोबरच वंजारी समाजाचा सर्वच क्षेत्रात प्रभाव असल्याने मविप्रप्रमाणेच या संस्थेलाही महत्त्व आहे. एवढेच नव्हे तर या संस्थेलाही शतकमहोत्सवी परंपरा लाभली आहे.
संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. सभासद संख्येत वाढ करणे, वारस सभासदांची नियुक्ती तसेच विश्वस्त व संचालक मंडळाची संख्या कमी करण्यासाठी घटनादुरुस्ती हा विषय या सभेचा होता. शेकडो सभासदांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने साहजिकच सभेला गर्दी होती. नेहमीच्या परंपरेप्रमाणे गडबड, गोंधळ किंवा आरोप-प्रत्यारोप न होता सभा शांततेत पार पडली. अनेक सभासदांनी अत्यंत उपयुक्त सूचना केल्यामुळे सभेचा नूर वैचारिक ठरला. अनेक सूचना आल्या असल्या तरी जवळपास प्रत्येकाने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा अत्यंत कळकळीने व पोटतिडिकेने मांडला. हा गेल्या अनेक वर्षातील सकारात्मक बदल म्हणावा लागेल. गुणवत्तेपेक्षा सत्तेच्या राजकारणालाच अलीकडे सगळ्याच संस्थांमध्ये महत्त्व आल्याने थेट सभासदांनीच गुणवत्तेची आठवण करून द्यावी, हे बरे झाले.
मविप्रसोबतच नाईक संस्थेचीही वाटचाल राहिलेली असली तरी कालौघात मविप्र कितीतरी पुढे निघून गेली; केवळ संख्यात्मकदृष्ट्याच नाही तर गुणवत्ता आणि व्यापक विद्याशाखांबाबतही ती अग्रेसर राहिली. त्याची वेगवेगळी कारणे असली तरी अलीकडे नाईक संस्थेबाबतही हा प्रगतीचा विचार होऊ लागला आहे. विशेषतः निवडणुकांच्या राजकारणात तो तावातावाने चर्चिला जातो; परंतु नंतर त्याचा हवा तसा पाठपुरावा होत नाही. तरीही अलीकडच्या दहा-पंधरा वर्षांत संचालकांनी अनेक मूलभूत सुविधा केल्या, हे मान्य करावे लागेल. त्याचमुळे सभासद संख्या वाढविण्याचा तसेच मयत सभासदांच्या वारसांना सदस्यत्व बहाल करण्याचा विषय ऐरणीवर आला. वंजारी समाज आता जिल्ह्याच्या राजकारणातही प्रभावी ठरू लागला आहे.
समाजाला गृहीत धरून आता कोणालाही राजकारण करता येत नाही, एवढी ताकद समाजाने मिळविली आहे. साहजिकच, संस्थेत काम करायला मिळावे अशी इच्छा समाजातील तरुणांमध्ये वाढीस लागली आहे. दहा हजार सभासद असलेली संस्था आज साडेसात हजारांवर आली आहे; त्यामुळे सभासद वाढविण्याचा मोठा रेटा आहे. सभेतही त्याचा उहापोह झाला. सभासद संख्या वाढवून केवळ निवडणुकीच्या राजकारणाला गती मिळेल, त्यातून शैक्षणिक भले होईलच, याची शाश्वती काय, असा थेट सवालच काहींनी विचारून या एकूणच विषयाला वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. सभासदत्वाच्या शुल्कावरूनही झालेली चर्चा त्याचाच प्रत्यय देणारी होती. शुल्क सामान्यांना परवडणारे असावे असे सांगतानाच अधिक शुल्क ठेवले तर ही संस्था श्रीमंतांच्या दावणीला बांधली जाण्याचा धोकाही व्यक्त झाला. त्याचबरोबरीने केवळ खोगीरभरती झाली तर संस्थेला सूज येईल, गुणवत्ता येईलच याची खात्री काय, असे सवालही काहींनी केले.
संचालक मंडळाची सध्याची २९ ही संख्या घटवून १९ वर आणण्याच्या प्रस्तावावरही साधकबाधक चर्चा झाली. संचालकांची संख्या कमी असणे केव्हाही फायद्याचेच; अधिकच्या संख्येमुळे अनेकदा लाटेत कोणीही संचालक होऊन जातो. अशांचा मग जागा अडविण्यापलीकडे फारसा उपयोग होत नाही. त्यामुळेच कदाचित सर्वांनीच संचालक संख्या मर्यादित ठेवण्यास अनुकूलता दर्शविली. फक्त तालुयांच्या प्रतिनिधीत्वावरून मतभेद दिसले ते साहजिकच. काही तालुयांमध्ये समाजाची लोकसंख्या भरपूर तर काही ठिकाणी अत्यल्प. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात तालुयांना सभासदत्व दिले जाण्याची शयता दिसते.
अलीकडे संस्थेच्या प्रगतीला वेग आलेला असला तरी पूर्वी ही प्रक्रिया रखडल्यासारखी झाली होती. सिंहावलोकन करताना झालेल्या चुका किंवा त्रुटी ओळखून, समजून घेऊन भविष्याची वाट अधिक निर्धोक करणे गरजेचे आहे. काहींनी तसा प्रयत्न नक्कीच केला आहे; या प्रयत्नांना यापुढे गुणवत्तेची जोड कटाक्षाने दिली गेली पाहिजे. सभेतही गुणवत्तेबाबतच अधिक बोलले गेले.आज संस्थेच्या ७१ शाखांमिळून २५ हजारांवर विद्यार्थी तर कर्मचारी संख्या दहा हजारांच्या आसपास असली तरी समाज ज्या गतीने पुढे चालला आहे, त्या तुलनेत ही संख्याही जाणीवपूर्वक वाढविता यायला हवी. सुदैवाने समाजाचे राज्य सरकारमध्येही प्रतिनिधीत्व चांगले आहे, लोकप्रतिनिधींची संख्याही मोठी आहे. अशा सर्वांची मोट बांधून संस्थेच्या भल्यासाठी जोमाने काम करायला हवे. सभासद संख्या वाढवायची किंवा कसे यावर अडून बसण्यापेक्षा शैक्षणिक गुणवत्तेत मात्र काहीही तडजोड होणार नाही, हे बघायला हवे.
संस्थेच्या मालकीच्या डोंगरे वसतिगृहाच्या मैदानाच्या वापरावरूनही सभेत काहींनी मल्लीनाथी केली; पण सध्या तरी त्यातून मिळणार्या उत्पन्नावर पाणी सोडणे परवडणारे नाही. महत्त्वाचे म्हणजे, अगदी अलीकडे संस्थेला कर्जमुक्त करण्यात यश आले आहे. संस्था नवे रूप घेण्याच्या उंबरठ्यावर असल्याने त्या दृष्टीनेच पावले टाकली जावीत, ही अपेक्षा.




