Thursday, November 26, 2026
HomeनगरAhilyanagar : शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून असहकाराचा एल्गार

Ahilyanagar : शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून असहकाराचा एल्गार

अशैक्षणिक ऑनलाईन कामांना नकार || व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

प्राथमिक शिक्षकांवर लादण्यात येणार्‍या अशैक्षणिक ऑनलाइन कामांचा वाढता अतिरेक आणि प्रशासकीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील सततचे संदेश व आदेशांच्या निषेधार्थ राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी असहकार आंदोलनाचा निर्धार केला आहे. 1 डिसेंबरपासून अशैक्षणिक ऑनलाइन कामे न करण्यासह प्रशासकीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षक भवनात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, टीईटीबाबत शासनाची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व, शाळांच्या मूलभूत समस्या आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली. अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार, विविध उपक्रमांची सक्ती आणि एनजीओचा वाढता हस्तक्षेप, यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. शासनाच्या या शिक्षण विरोधी धोरणा विरोधात राज्य समन्वय समिती टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलन करणार आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या, यासाठी भूमिका घेतली आहे.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्राचे दिव्यांग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना या संघटनांचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

नगरच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा
4 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येत ‘आम्हाला शिकवू द्या’ या मागणीसाठी मोर्चा काढला होता. या आंदोलनची राज्यभर चर्चा झाली होती. संघटना भेद बाजूला ठेवून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकत्र येणे आवश्यक होते. याचा बोध घेवून राज्यातील संघटना एकत्र येत पुणे येथे राज्य समन्वय समिती स्थापन झाली आहे. शेवटी सर्व संघटना मतभेद बाजूला ठेवून शिक्षक प्रश्नी एकत्र आल्याबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. 1 डिसेंबरपासून मात्र सर्व शिक्षकांनी प्रशासकीय ग्रुप मधून बाहेर पडावे, असे आदेश शिक्षक समन्वय संघटनेने दिले आहे.

प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध
राहुरी व परभणी येथे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणामध्ये अतिरेकी दबावामुळे, प्रशासनाच्या कडक धोरणामुळे व वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दोन शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे शिक्षकांमध्ये संताप निर्माण झाला असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन घटनेस दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची करण्याची मागणी समन्वय समितीने केली व प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

ताज्या बातम्या

Crime News : कोपरगावात होलसेल दुकानात मध्यरात्री 3 लाखांची चोरी

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon शहरातील महालक्ष्मी ट्रेडर्स या होलसेल दुकानात मध्यरात्री तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची...