कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
शहरातील महालक्ष्मी ट्रेडर्स या होलसेल दुकानात मध्यरात्री तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाजवळील कुलूप कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स, 15 ते 20 हजार रुपयांची चिल्लर आणि 25 ते 30 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या वायर कापल्या.
तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला. मात्र, चोरट्यांची एक महत्त्वाची हालचाल अन्य एका सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. यात तीन ते चार चोरटे कारमधून दुकानाच्या मागील बाजूस येताना आणि चोरीचा मुद्देमाल कारमध्ये भरून नेताना दिसत आहेत. चोरी झाल्याचे लक्षात येताच दुकानमालकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा पोलिस कधी शोध घेतात, याकडे व्यापार्यांचे लक्ष लागले आहे.




