Thursday, November 26, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २६ नोव्हेंबर २०२६ - पेपरफुटीची पाळेमुळे समूळ उखडा!

संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२६ – पेपरफुटीची पाळेमुळे समूळ उखडा!

स्पर्धा परीक्षा म्हणजे तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारी आणि गुणवत्तेच्या बळावर भविष्य घडवण्याची संधी असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी असो किंवा शहरातील मध्यमवर्गीय तरुण, सरकारी नोकरीच्या आशेने लाखो विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करतात. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव मनात ठेवून वर्षानुवर्षे मेहनत घेतात. मात्र, त्यांच्या या मेहनतीवर पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांमुळे पाणी फिरत असेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती? गुणवत्तेऐवजी पैसा, वशिला आणि गैरमार्गांना महत्त्व मिळत असेल, तर स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेलाच तडा जातो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी व्ही. राधा समितीचा अहवाल आणि त्यातील शिफारशी स्वीकारून कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे.

- Advertisement -

अहवालातील सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे पेपरफुटी करणार्‍यांना दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दहा कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्याची शिफारस. ही शिक्षा परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार करणार्‍यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करणारी ठरली पाहिजे. कारण पेपरफुटी हा केवळ आर्थिक गैरव्यवहार किंवा प्रशासकीय अनियमिततेचा प्रकार नाही. तो लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर, त्यांच्या स्वप्नांवर आणि त्यांच्या भविष्यावर केलेला अन्याय आहे. एका पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते, मानसिक तणाव वाढतो, परीक्षा रद्द होते, भरती प्रक्रिया रखडते आणि शासनाच्या परीक्षा यंत्रणेवरील विश्वास कमी होतो. मात्र, कठोर शिक्षेची तरतूद करणे म्हणजेच समस्येवर पूर्णविराम देणे नव्हे. गुन्हा घडल्यानंतर आरोपींना शिक्षा होणे आवश्यकच आहे; पण गुन्हा घडण्याची शयताच संपवणारी व्यवस्था उभारणे अधिक महत्त्वाचे आहे.

पेपर तयार करण्यापासून ते छपाई, वाहतूक, सुरक्षित साठवणूक, वितरण आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर गोपनीयता आणि सुरक्षिततेचे कठोर निकष असले पाहिजेत. डिजिटल प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही देखरेख आणि तांत्रिक यंत्रणा यांचा वापर सुरक्षित पद्धतीने होतो की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. कुठेही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. व्ही. राधा समितीने परीक्षा व्यवस्थेतील विविध त्रुटींचा विचार करून परीक्षा शुल्क, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, तपास यंत्रणा आणि भरती प्रक्रियेतील अनियमितता अशा महत्त्वाच्या मुद्यांवर शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी करताना केवळ कागदोपत्री सुधारणा करून चालणार नाही.

परीक्षा घेणार्‍या संस्थांची विश्वासार्हता तपासणे, तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करणे, सायबर सुरक्षेला प्राधान्य देणे आणि परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे. गैरप्रकार करणार्‍यांना राजकीय किंवा प्रशासकीय अभय मिळणार नाही, याची शासनाने ठोस हमी दिली पाहिजे. सामान्य विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. वयाची मर्यादा जवळ आलेली असते. आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत परीक्षा रद्द झाली किंवा भरती प्रक्रिया रखडली, तर त्यांचे नुकसान केवळ वेळेचे राहत नाही; तर त्यांच्या आयुष्याच्या नियोजनावरही परिणाम होतो. त्यामुळे एखाद्या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची जबाबदारीही शासनाने स्वीकारली पाहिजे. परीक्षा आणि निकालांचे वेळापत्रक निश्चित करून त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

फडणवीस यांनी समितीच्या शिफारशी स्वीकारून कायद्यात बदल करण्याची घोषणा केली, ही सकारात्मक सुरुवात आहे. परंतु घोषणांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची असते. प्रस्तावित कायदा प्रभावी, स्पष्ट आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारा असावा. गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण व्हावा, दोषींना शिक्षा व्हावी आणि तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये. शेवटी, स्पर्धा परीक्षा या गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवण्याचे व्यासपीठ असले पाहिजे, भ्रष्टाचारातून नोकर्‍या मिळवण्याचा बाजार नव्हे. दहा वर्षांचा कारावास आणि दहा कोटींच्या दंडाची तरतूद ही पेपरफुटीच्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी प्रभावी शस्त्र ठरू शकते; मात्र त्यासाठी कठोर कायद्याबरोबरच प्रामाणिक प्रशासन आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवता आला पाहिजे. कारण देशाचे भविष्य घडवणार्‍या तरुणांच्या स्वप्नांचा सौदा करणार्‍यांना कायद्याने कठोर धडा शिकवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर समाजाप्रती असलेले कर्तव्यही आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून असहकाराचा एल्गार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्राथमिक शिक्षकांवर लादण्यात येणार्‍या अशैक्षणिक ऑनलाइन कामांचा वाढता अतिरेक आणि प्रशासकीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील सततचे संदेश व आदेशांच्या निषेधार्थ राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी...