Thursday, August 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : बडा घर, पोकळ वासा!

पडसाद : बडा घर, पोकळ वासा!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेनेच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्याची नेमकी कारणे काहीही असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्याही म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांचे श्वशूर विठ्ठल कदम यांच्याशी झालेले व्यावहारिक मतभेद हे मुख्यत्वे कारणीभूत असावेत, असे आता ठामपणे म्हणता येते. याचे प्रमुख कारण म्हणजे नुकतेच गोडसे यांनी या श्वशुरांसंदर्भात केलेले विधान. गोडसे म्हणाले होते, कदम यांच्या सांगण्यावरून इच्छा नसताना आपण नाशिक साखर कारखाना पुण्याच्या घावटे यांच्या कंपनीला दिला. त्यांनी कारखान्याचे वाटोळे केले. आता सहा महिन्यांनंतर म्हणजेच कारखान्याला सगळ्याच यंत्रणांनी नोटिसा बजावल्यानंतर गोडसे यांना कंठ फुटल्याने हे प्रकरण दिसते तेवढे सहजसाधे निश्चितच नाही.

केवळ याच कारखान्याचा विचार करूनही भागणार नाही. गोडसेंनी त्यांच्या चलतीच्या काळात नाशिकबरोबरच निफाड साखर कारखानाही भाडेतत्त्वावर चालवायला घेतला होता. दोन्हीकडे त्यांनी आपल्या मित्रमंडळींना फायनान्सर म्हणून घेतले होते. दोन्ही कारखान्यांचे सध्या वाटोळे झालेले असल्याने गोडसेंना कदमांवर सारा दोष टाकून नामानिराळे होता येणार नाही. या दोन्ही कारखान्यांत ज्या त्यांच्या मित्रमंडळींनी वेळोवेळी आर्थिक गुंतवणूक केली, त्यांचीही भावना कदाचित आज गोडसेंप्रमाणेच असू शकेल. मित्रामुळे आम्ही अडचणीत आलो, असे त्यापैकी काही खासगीत बोलतातही. परंतु एकनाथ शिंदेंसारख्या शक्तिशाली नेत्याच्या नातेवाईकाविरोधात गोडसे जेव्हा जाहीर विधान करतात, तेव्हा त्यांनी भविष्यातील काही योजनांची निश्चितच आखणी केलेली असणार.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर गोडसेंना विधान परिषद किंवा राज्यसभेबाबत पक्षाकडून आशा होती. भावना गवळींना आमदारकीची संधी मिळाली; मात्र आपल्याला डावलले गेले, याचे शल्य उराशी बाळगून त्यांनी पक्ष कार्यक्रमांत फटकून राहण्यास सुरुवात केली होतीच. अशातच आता साखर कारखाना प्रकरण बाहेर आले. गंमत म्हणजे, दोन्ही कारखान्यांत शिंदेंचे व्याही विठ्ठल कदम हे गोडसेंबरोबर सहभागी आहेत. अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे दोन्ही व्यवहार झालेले आहेत. त्यांच्या व्यवहाराच्या खोलात शिरण्याची लागलीच गरज नाही. परंतु एका राजकीय महत्त्वाकांक्षेचा यानिमित्ताने अपमृत्यू होत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

खरेतर २०१३-१४ पासून नाशिक सहकारी साखर कारखाना बंद होता. नाशिकसह सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर अशा चार तालुयांतील म्हणजेच लोकसभा मतदारसंघातील सुमारे ३५५ गावांच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, भागधारक व कामगारांच्या हितासाठी हेमंत गोडसे यांनी हा आजारी कारखाना चालविण्यास घेण्याचे धाडस केले. तेव्हा त्यांच्या या निर्णयाचे चांगलेच कौतुक झाले होते. सुरुवातीला तीन वर्षे कारखाना त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी नेटाने चालविलादेखील. आता सगळे काही सुरळीत होत असतानाच विठ्ठल कदम यांच्या आग्रहास्तव कारखाना पुण्याच्या प्रसाद घावटे यांच्या कंपनीला चालवायला दिला गेला. खरे तर गोडसेंच्या कंपनीने २४ वर्षांच्या भाडेकराराने जिल्हा बँकेकडून हा कारखाना चालवायला घेतला असताना त्यांना तिसर्‍याच कंपनीला तो चालवायला देता येतो का, हा प्रश्न आहे.

शिवाय इतर कोणाला तरी चालवायला द्यावा लागतो, म्हणजे काहीतरी आर्थिक गणित बिघडलेले असणार. त्याशिवाय असा पोटभाडेकरू कसा नेमला, हा प्रश्न उभा राहतो. गंमत म्हणजे सगळेच सरकारी जावई असल्याने त्यांच्या या कृतीला कोणी विरोधही केला नसणार आणि साधी विचारणाही केली नसणार. या प्रकरणात गोडसे खरेच फसले की फसवले गेले, हा प्रश्न तर आहेच, शिवाय यात त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचीही कुतरओढ झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. सध्या कारखान्यावर शेतकर्‍यांचे अडीच कोटी, कामगारांचे एक कोटी, वीजबिल १४ लाख, जिल्हा बँकेचे साडेपाच लाख, पुरवठादारांचे दीड कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेचे पावणेदोन कोटी अशी देणी आहेत. बरं हे सारे असताना नव्या मालकाने ताब्यातील लाखो पोती साखर परस्पर विकल्याचाही आरोप आहे. या सार्‍या सव्यापसव्यात गोडसेंच्या इतर भागीदारांची अवस्था तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी असू शकेल.

एकूणच, या देवघेवीच्या भानगडीत गोडसेंच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झाल्याचे दिसते आहे. त्यांनी ज्या हिमतीने शिंदेंच्या व्याह्याला भरबाजारात उभे केले, याचा अर्थ एकतर ते कमालीचे त्रासले असावेत किंवा आता आरपारची लढाई करण्याचा निर्धार त्यांनी केलेला असावा. यातून काय निष्पन्न होईल, ते येणार्‍या काळात दिसेलच. परंतु या उभयतांच्या भानगडीत शेतकरी व कामगारांबरोबर वित्तीय संस्थाही होरपळल्या जात आहेत. बडा घर, पोकळ वासा या उक्तीची आठवण व्हावी असाच हा सारा मामला आहे. याप्रकरणी कार्यक्षेत्रातील सगळ्याच पक्षांचे लोकप्रतिनिधीही मिठाची गुळणी धरून बसले आहेत. मध्यंतरी आमदार गोकुळ गिते व माजी आमदार अनिल कदम यांनी त्यांच्या शेतकर्‍यांचा विषय मांडला होता. नंतर तेदेखील शांत झाले. गोडसेंचा शिंदेंविरोधातील एल्गार नजीकच्या भविष्यात कोणते वळण घेतो, हे पाहणे राजकीय निरीक्षकांसाठी औत्सुयाचे ठरावे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ ऑगस्ट २०२६ – खासगी शिकवणी वर्गांना शिस्त लागेल?

0
राज्यातील शिक्षण क्षेत्र व लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या काही अनिर्बंध खासगी शिकवणी वर्गांना शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र खासगी कोचिंग सेंटर (नोंदणी व नियमन)...