अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त कर्मचार्याची तब्बल 29 लाख 42 हजार 940 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनन्या देशमुख, गुल टेकचंदानी असे संशयित मोबाईलधारक आरोपींची नावे आहेत. याबाबत राजीव रत्नाकर माचवे (रा. रवीकिरण बंगला, सातभाई मळा, अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी सेवानिवकृत्त कर्मचारी आहेत.
29 जून 2026 ते 22 सप्टेंबर 2026 दरम्यान संशयित आरोपी अनन्या देशमुख आणि गुल टेकचंदानी यांनी फिर्यादीशी व्हॉट्सपद्वारे संपर्क साधला. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा परतावा (नफा) मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण 29 लाख 42 हजार 940 रुपये उकळले. कोणताच परतावा न मिळाल्याने व आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी 24 सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक सागर ढिकले गुन्ह्याचा तपास करीत आहेत.




